इंद्राणी-शीनाचे डीएनए जुळले
By admin | Published: September 8, 2015 05:43 AM2015-09-08T05:43:46+5:302015-09-08T05:43:46+5:30
पेणच्या गागोदे खिंडीत आरोपींनी जाळलेला व नंतर स्थानिक पोलिसांनी पुरलेला मृतदेह शीना बोराचाच होता, हे स्पष्ट करणारा आणखी एक पुरावा खार पोलिसांच्या हाती लागला आहे.
मुंबई : पेणच्या गागोदे खिंडीत आरोपींनी जाळलेला व नंतर स्थानिक पोलिसांनी पुरलेला मृतदेह शीना बोराचाच होता, हे स्पष्ट करणारा आणखी एक पुरावा खार पोलिसांच्या हाती लागला आहे. कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीनुसार गागोदे खिंडीतून मुंबई पोलिसांनी हस्तगत केलेल्या हाडांचे डीएनए मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीशी जुळले आहेत. यावरून इंद्राणी ही शीनाची बहिण नसून आई होती ही महत्वाची बाब स्पष्ट झाल्याचे पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी सोमवारी रात्री सांगितले.
गागोदे खिंड येथे जाऊन खार पोलिसांनी शीनाचा मृतदेह पुरलेल्या जागी खोदकाम करून कवटी, हाडे असे अवेशष हस्तगत केले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत या अवशेषांचा डीएनए काढण्यात आला. तो इंद्राणीच्या रक्तातील डीएनएशी जुळवून पाहिला गेला. या चाचणीत दोन्ही नमुने जुळल्याचा प्राथमिक अहवाल प्रयोगशाळेने पोलिसांना दिला आहे. यानंतर प्रयोगशाळेत सिद्धार्थ व शीना यांचे डीएनए नुमने जुळवून पाहिले जाणार आहेत.
डीएनए चाचणीचा अहवाल हा दुसरा भक्कम आमच्या हाती लागला आहे. शीनाची हत्या झाली तर मृतदेह कुठे आहे हा न्यायालयाकडून किंवा आरोपींच्या वकिलांकडून खटल्यादरम्यान पोलिसांना विचारला जाणारा पहिला प्रश्न होता. मृतदेह न सापडल्याने खटल्यात पोलिसांची बाजू कमकुवत पडते की काय अशी चर्चा होती. मात्र डीएनए चाचणीवरून गागोदे खिंडीत जाळलेला, पुरलेला मृतदेह शीनाचाच होता हे स्पष्ट झाले आहे. हा डीएनए अहवाल आता आरोपींविरोधातला भक्कम पुरावा ठरू शकेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. शीना आपली बहिण असल्याचा अभास इंद्राणीने उभा केला होता. डीएनए चाचणीवरून ती तिची मुलगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याआधी मुंबई पोलिसांनी गागोदे खिंडीतून हस्तगत केलेल्या कवटी व चेहेऱ्याच्या अन्य हाडे जुळवून त्यावर नायर रूग्णालयात डीजीटल फेशिअल सुपर इम्पोझिशन चाचणी करण्यात आली. या चाचणीतून समोर आलेला चेहेरा हा शीनाच्या छायाचित्राशी जुळला होता.
पीटर मुखर्जीही आरोपी ?
पीटर मुखर्जी अद्यापही चौकशी सुरु असून हत्याकांडामध्ये त्याचा सहभागी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.