प्रशांत कोरटकर परदेशात पळून गेल्याचा दावा; इंद्रजित सावंत म्हणाले, “हे गृह खात्याचे अपयश”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:25 IST2025-03-22T14:23:14+5:302025-03-22T14:25:02+5:30
Indrajeet Sawant News: कायद्याचे संरक्षण नसताना, गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेला असेल, तर हे गृहखात्याचे अपयश आहे, असे इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

प्रशांत कोरटकर परदेशात पळून गेल्याचा दावा; इंद्रजित सावंत म्हणाले, “हे गृह खात्याचे अपयश”
Indrajeet Sawant News: छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बऱ्याच तपासानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. एकीकडे पोलिसांकडून शोध सुरु असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. यावरून आता इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया देताना गृह खात्याचे हे अपयश असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना इंद्रजित सावंत म्हणाले की, शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मदत करणारी प्रवृत्तीला शोधून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब यांचा जो अपमान करेल तो सुटता कामा नये, असे सावंत यांनी म्हटले आहे. तसेच कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली.
महिनाभर उलटून गेला तरी काहीच होत नाही
मी कोल्हापूरमध्ये राहतो. माझा आणि त्या कोरटकरचा आयुष्यात कधीच संबंध आलेला नव्हता. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाइल नंबर त्याला कोणी दिला? या गोष्टीचासुद्धा तपास केला पाहिजे. माझा नंबर कुठून मिळाला, त्याच्या मोबाइलमध्ये जे कम्युनिकेशन झाले ते आत्तापर्यंत तपासायला पाहिजे होते. महिनाभर उलटून गेला तरी यातील काहीच होत नाही. त्यामुळे आधी मला जी आशा होती, ती आता कमी होत चालली आहे, पोलिसांशी माझे थेट बोलणे झाले नाही, माझे वकील पोलिसांना भेटून आले आहेत, असे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हेच गृहमंत्री आहेत, त्यामुळे हे सगळे प्रकरण अगदी चिल्लर आहे असे समजू नये. तो विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण हा मुद्दा फक्त इंद्रजित सावंतला धमकी मिळाली, शिवीगाळ केली एवढाच नाही. तर एखाद्या व्यक्तीच्या, तेही मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्याच, शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत, हे त्यांनी पाहिले पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मने व्यथित झालेली आहेत. याची दखल त्यांनी एक संवेदनशील मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून घ्यावी अशी अपेक्षाा आहे, असे इंद्रजित सावंत म्हणाले.