इंद्रायणीतीरी हरीभक्तीचा जागर
By admin | Published: March 14, 2017 04:40 AM2017-03-14T04:40:35+5:302017-03-14T04:40:35+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३६९ वा बीजोत्सव सोहळा मंगळवारी होत असून राज्यभरातून भाविक वारकरी दिंडीकरी फडकरी देहूनगरीत दाखल होत आहेत.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ३६९ वा बीजोत्सव सोहळा मंगळवारी होत असून राज्यभरातून भाविक वारकरी दिंडीकरी फडकरी देहूनगरीत दाखल होत आहेत. श्री संत तुकाराम महाराज संस्थानसह प्रशासकीय यंत्रणा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.
आठवडाभरापासून श्री क्षेत्र देहूनगरीतील इंद्रायणी नदीकाठी, मोकळ्या शेतात राहुट्यामध्ये टाकून आणि विविध धर्मशाळेत अखंड हरिनामाचा जागर सुरु आहे. त्याची सांगता मंगळवारी होणार आहे. मात्र संस्थानचा बीजोत्सव सोहळ्याची सांगता २१ मार्च रोजी लळीत या पारंपरिक कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष शांताराम महाराज मोरे यांनी दिली.
यात्रेनिमित्ताने मंदिरातील देऊळवाडा व वैंकुठगमण मंदिराला संस्थानच्या वतीने आकर्षक रोषणाई केली आहे. त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंप अप्रतिम दिसत आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाचा बंदोबस्त सुरू
आहे. पोलीस निरिक्षक अरूण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार
उद्या गावातील जड वाहतूक बंद करण्यात येणार असून फक्त भाविकांची वाहने गावाजवळ येऊ दिली जातील. आळंदीकडून येणारी वाहने विठ्ठलनगर तळवडे जकात नाक्याजवळ थांबविली जातील. देहूरोडकडून आलेली वाहने सीओडी येथे थांबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)