‘इंद्राणीने बहिणीसारखे नव्हे, तर मुलीप्रमाणे वागवावे’
By admin | Published: December 18, 2015 01:06 AM2015-12-18T01:06:04+5:302015-12-18T01:06:04+5:30
इंद्राणी मुखर्जीने बहिणीप्रमाणे न वागवता मुलीप्रमाणेच वागवावे, अशी शीनाची खूप इच्छा होती. इंद्राणीच्या बहिणीचे सोंग तिला करायचे नव्हते. इंद्राणी विधीला
मुंबई : इंद्राणी मुखर्जीने बहिणीप्रमाणे न वागवता मुलीप्रमाणेच वागवावे, अशी शीनाची खूप इच्छा होती. इंद्राणीच्या बहिणीचे सोंग तिला करायचे नव्हते. इंद्राणी विधीला (संजीव खन्ना आणि इंद्राणीची मुलगी) मुलगी म्हणून वागणूक देत होती आणि हे शीनाला खटकत होते. तिला अत्याचार झाल्यासारखे वाटत होते, असे शीनाचा प्रियकर राहुल (पीटर मुखर्जीचा मुलगा) याने दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवलेल्या जबाबात सांगितले. त्याच्या जबाबाची प्रत गुरुवारी बचावपक्षाच्या हाती पडली.
दरम्यान, २०१२मध्ये शीनाने पुढील शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासंदर्भात तिने इंद्राणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. २४ एप्रिल २०१२ रोजी राहुलने शीनाला वांद्रे येथील राहत्या घरी सोडले. त्याच दिवशी शीना इंद्राणीला भेटली. त्यानंतर राहुलने शीनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शीनाने उत्तर दिले नाही. त्याने इंद्राणीला संपर्क केल्यावर इंद्राणीने राहुलला तिला (शीना) कोणीतरी भेटले आहे. पुढील दोन महिने तिला त्याच्याशी संपर्क करायचा नाही, असे सांगितल्याचेही तो म्हणाला.
शीनाला शोधण्यासाठी राहुल पीटरच्या घरी गेला. मात्र तिथेही शीना त्याला भेटली नाही. त्यामुळे राहुलने थेट पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी शीना आईबरोबर असल्याने आणि त्या दोघांचे लग्न झाल्याने काळजी करू नका, असा सल्ला राहुलला दिला.
शीनाबाबत इंद्राणी वेगवेगळी कहाणी सांगत असल्याने राहुलला तिच्यावर संशय आला. त्याने पोलीस अधिकारी परमवीर सिंह आणि शीनाचे बॉस शुभोदॉय मुखर्जींची भेट घेतली. मुखर्जींनी त्याला शीना हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची सूचना केली. मात्र पोलीस तक्रार घेण्यास तयार नव्हते.
मुंबई मेट्रोचे ह्युमन रिर्सोसेस विभागाचे मुख्य शुभोदॉय मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाने वेळेच्या आधीच कार्यालय सोडले. त्यानंतर तिने कधीच रिपोर्ट केला नाही. ‘मी माझ्या आॅफिस बॉयला तिच्या घरी पाठवले. त्याने शीना घरात नसून तिचा मित्र (राहुल) घरात असल्याचे सांगितले. मी त्याला शीनाच्या मित्राला तिचा ठावठिकाणा विचारण्यासाठी पाठवले. परत आल्यावर आॅफिस बॉयने तिच्या मित्रालाही तिच्या ठावठिकाण्याविषयी माहीत नसल्याचे सांगितले,’ असे मुखर्जी यांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर मुखर्जींनी आॅफिस बॉयला शीनाचा लॅपटॉप आणायला सांगितले. काही दिवसांनी त्याला राहुल भेटायला आला. इंद्राणी शीनाला राहुलबाबत काहीतरी बोलली असावी, त्यामुळे ती परत येत नाहीये, असा संशय राहुलने मुखर्जींकडे व्यक्त केला. त्याचप्रमाणे शीना माझी मुलगी नाही, तर बहीण आहे, असे तिने ठामपणे मुखर्जींना सांगितले. शीना दुसरीकडे गेली असून, तिला काही महिने कोणाशीही संपर्क करायचा नाही, असे इंद्राणीने मुखर्जींना सांगितले. शीना कुरिअरद्वारे राजीनामा पाठवत आहे, असेही इंद्राणीने सांगितले. दुसरीकडे पीटरच्या इमारतीचा व्यवस्थापक मधुकर किलजे यांनी २३ एप्रिल २०१२ ते २५ एप्रिल २०१२ या कालावधीत इंद्राणी आणि तिचा ड्रायव्हर श्यामवर राय हे सातत्याने घराबाहेर जात आणि पुन्हा घरी येत, असे दंडाधिकाऱ्यांना जबाबात सांगितले. २४ आॅगस्ट २०१२ ला इंद्राणीने विधीच्या नावे बक्षीसपत्र तयार केले आणि २७ आॅगस्टच्या मिटिंगमध्ये सादर करण्यास सांगितले.
इंद्राणीच्या कोठडीत ४ जानेवारीपर्यंत वाढ
न्यायालयाने सुनावणी ४ जानेवारीपर्यंत तहकूब करत इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ जानेवारीपर्यंत वाढ केली.
इंद्राणीने राहुल आणि शीनाला केले वेगळे
मार्च २००९मध्ये इंद्राणी आणि तिचा सहकारी राहुलच्या फ्लॅटवर जाण्यापूर्वी पीटरने राहुलला सांगितले की, इंद्राणी येथे त्यांना (शीना आणि राहुल) वेगळे करण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे इंद्राणीने खरोखरच शीना आणि राहुलला वेगळे केले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शीनाने राहुलशी संपर्क करत ती बंंगळुरूला असल्याची माहिती दिली. ‘शीनाने मला ती बंगळुरूमध्ये तिचा आधीचा प्रियकर कौस्तुभबरोबर राहत असल्याचे सांगितले. तो तिच्याबरोबर पुन्हा एकदा प्रेमाचे संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र तिला त्याच्याबरोबर राहायचे नव्हते. एके दिवशी त्याने शीनाच्या पायावर बीअरची बाटली फेकून मारली,’ असे राहुलने दंडाधिकाऱ्यांना सांगितले.