इंद्राणीला एका दिवसाचा जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 03:51 AM2016-12-23T03:51:24+5:302016-12-23T03:51:24+5:30
वडिलांचे श्राद्ध घालण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला एक दिवसाचा जामीन मंजूर
मुंबई : वडिलांचे श्राद्ध घालण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला एक दिवसाचा जामीन मंजूर केला. मात्र या वेळी तिला कडेकोट पोलीस बंदोबस्तात नेण्यात येणार आहे.
इंद्राणीला गुवाहटीला न नेता मुंबईतच वडिलांचे श्राद्ध घालण्याची परवानगी गुरुवारी विशेष न्यायालयाने दिली. तिला चोख पोलीस बंदोबस्तात नेण्यात यावे व यादरम्यान तिला प्रसारमाध्यमांशी बोलू देऊ नये, असा आदेश विशेष न्यायालयाने पोलिसांना दिला.
वडिलांचे श्राद्ध घालण्याकरिता इंद्राणीला आसाममध्ये पाठवण्यास सीबीआयने विरोध केला. इंद्राणीचे वडील उपेंद्र कुमार यांचे १५ डिसेंबर रोजी निधन झाले.
इंद्राणीने तिचा मुलगा मिखाईलला पाठवलेला मेल सीबीआयने न्यायालयाला दाखवला. या मेलमध्ये तिने आपल्याला गुवाहटीला येण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.
मिखाईल या खटल्यातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यानेही इंद्राणीला गुवाहटीमध्ये श्राद्धासाठी पाठवू नये, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. गेली तीन वर्षे आजोबांनी (उपेंद्र कुमार) इंद्राणीच्या आर्थिक व मानसिक पाठिंब्याशिवाय नातवांना पाहिले. गेले एक वर्ष ते अंथरुणाला खिळून होते. आता इंद्राणीला श्राद्धासाठी गुवाहटीला पाठवले तर ती येथे गोंधळ घालेल. त्यामुळे तिला येथे (गुवाहटी) येण्याची परवानगी देऊ नये, असे मिखाईलने अर्जात म्हटले आहे.
तर सीबीआयनेही इंद्राणीला गुवाहटीमध्ये न पाठवण्याची विनंती न्यायालयाला केली. खटला काही दिवसांतच सुरू होईल. त्यामुळे सरकारी साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी तिला कारागृहाच्या बाहेर पडायचे आहे. ती प्रवासात पळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इंद्राणीची आई १ आॅक्टोबर रोजी वारली तर इंद्राणीने तिच्या अर्जात आई नोव्हेंबरमध्ये वारल्याचे नमूद केले आहे. यावरून ती तिच्या पालकांशी किती जवळ होती, हे सिद्ध होते. तिच्या वडिलांवर मिखाईलने अंतिम संस्कार केले आहेत. त्यामुळे तिला तिथे जाण्याची आवश्यकता नाही.
त्यावर तिच्या वकिलांनी इंद्राणीला किमान हरिद्वार, नाशिक किंवा मुंबई येथे श्राद्ध घालण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत तिला एक दिवसाचा जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)