इंद्राणी मुखर्जीने दाखल केला जामीन अर्ज
By admin | Published: February 6, 2016 03:32 AM2016-02-06T03:32:15+5:302016-02-06T03:32:15+5:30
शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने प्रकृती खालावत असल्याची सबब पुढे करत विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे
मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने प्रकृती खालावत असल्याची सबब पुढे करत विशेष सीबीआय न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी एका आठवड्याने ठेवली आहे.
गेल्या चार महिन्यांत १८ किलो वजन कमी झाले असल्याचे इंद्राणीने १७ पानी जामीन अर्जात म्हटले आहे. तिच्या म्हणण्याला दुजोरा मिळण्यासाठी तिने ५० पानी वैद्यकीय अहवाल जोडला आहे.
इंद्राणीला ‘कॉर्निक स्मॉल व्हेसल्स इनकेमिक चेंजस’चा त्रास असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. यामुळे तिच्या जिवाला धोका आहे, असे इंद्राणीची वकील गुंजन मंगला यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे.
कधीकधी इंद्राणीला काहीच कळेनासे होते. तिची प्रकृती अत्यंत खालवल्याने तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि तणावमुक्त वातावरणात ठेवण्याची आवश्यकता आहे. भायखळा जेलमधून रुग्णालयात पोहोचण्यासाठी ४५ ते ६० मिनिटे लागतात. गेल्या वेळी जेव्हा इंद्राणी पहाटे ५ वाजता बेशुद्ध पडली होती, तेव्हा सकाळी ११ वा. ४५ मिनिटांनी डॉक्टर आले आणि रुग्णालयात हलवण्यासाठी त्यानंतर आणखी एक तास घेण्यात आला, असे इंद्राणीच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.
केवळ वैद्यकीय कारण पुढे करूनच इंद्राणीने जामिनावर सुटका करण्याची मागणी न्यायालयापुढे केली आहे. या हत्याप्रकरणात केवळ श्यामवर राय यानेच जामिनासाठी अर्ज केलेला नाही. (प्रतिनिधी)