मंजुळावरील अत्याचाराचा इंद्राणी मुखर्जीने वाचला पाढा
By admin | Published: June 29, 2017 01:48 AM2017-06-29T01:48:52+5:302017-06-29T01:48:52+5:30
शीना बोरा हत्येमधील मुख्य आरोपी आणि मंजुळा शेट्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदवलेल्या २०० जणींपैकी एक असलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शीना बोरा हत्येमधील मुख्य आरोपी आणि मंजुळा शेट्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदवलेल्या २०० जणींपैकी एक असलेल्या इंद्राणी मुखर्जीला बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी तिने मंजुळा शेट्येवर कारागृह प्रशासनाने केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. या घटनेचा निषेध केल्यावर कारागृह प्रशासनाने तिला केलेल्या मारझोडीबद्दल व दिलेल्या धमकीबद्दल पोलिसांत तक्रार करण्याची परवानगी विशेष न्यायालयाने इंद्राणीला दिली आहे.
महिला पोलिसांनी मंजुळा शेट्येला मारझोड केल्याचे मी पाहिले आहे. तिच्या गळ्यात फासाप्रमाणे साडी अडकविण्यात आली आणि तिला फरफटत नेण्यात आले, असे इंद्राणीने विशेष न्यायालयाला सांगितले.
शेट्येवर अमानवी अत्याचार करण्यात आल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. शेट्येला ज्या रूममध्ये खेचत नेण्यात आले, त्या रूमला एक छिद्र आहे, या छिद्रातून माझ्याबरोबरच काही कैद्यांनी हा प्रसंग पाहिल्याचा दावाही तिने केला.
मंजुळाचा मृत्यू झाल्याचे समजताच तीव्र निषेध करीत कैदी आक्रमक झाले. त्या वेळी कारागृह अधीक्षकाने लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. लाइट बंद करून कैद्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यासाठी पुरुष पोलिसांनाही बोलावण्यात आले, असेही इंद्राणीने न्यायालयाला सांगितले.
मी या घटनेची साक्षीदार बनेन आणि तक्रार नोंदवेन, असे पोलिसांना सांगताच त्यांनी मलाही मंजुळाप्रमाणेच परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. पोलिसांनी माझ्या हातावर आणि डोक्यावर मारले. त्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आले, असे ती म्हणाली.
यावर न्या. जे. सी. जगदाळे यांनी इंद्राणीची वैद्यकीय चाचणी करून तिला कारागृह प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यासाठी नागपाडा पोलीस ठाण्यात नेण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले.
‘मंजूळाच्या किंकाळीने सुन्न झाले...’
सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज आवरले. त्यानंतर अचानक मोठा आवाज ऐकला. सर्वच महिला कैद्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मीही तिथे पोहचले. त्या वेळी नजरेसमोर मंजूळाला होत असलेली मारहाण आणि तिच्या किंकाळीने आम्ही साऱ्या जणी सुन्न झाल्याचे १२ दिवसांनंतर कारागृहातून बाहेर आलेल्या एका प्रत्यक्षदर्शी महिला कैदीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रेश्माला (नावात बदल) काही दिवसांपूर्वीच अपघाताच्या गुन्ह्यांत कारागृहात कैद केले. मंजुळाच्या मारहाणीदरम्यान तीदेखील हजर होती. रेश्माला बरॅक क्रमांक ३मध्ये ठेवण्यात आले होते. सकाळी साडेपाच वाजता उठायचे. त्यानंतर कारागृहातील बरॅक झाडलोट करून सफाई करायची. २३ तारखेला सकाळी जोराचा आवाज झाला म्हणून धावत बाहेर गेलो तेव्हा मंजूळाला मारहाण होत असल्याचे पाहिले. तिच्यावरील अमानुष मारहाणीमुळे आम्ही घाबरलो. त्यात आम्हालाही तशीच मारहाण करण्याची धमकी दिल्याने माझ्यासह अन्य कैद्यांनी बरॅकमध्ये पळ काढला.
त्यानंतर कारागृहातील प्रत्येक क्षण जीवघेणा वाटत होता. यात आणखीन पाच दिवस काढायचे होते. बाहेर येण्यापूर्वी आपलीही मंजूळा होणार नाही ना? यामुळे निमूटपणे सारंकाही सहन करत होतो. आतमध्ये जेवणही बरोबर नाही. महिला कैदी राजरोसपणे विड्या ओढतात. त्यांना तंबाखूही पुरविला जातो. याच विड्या ओढण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या काडीपेटीचा वापर करून कारागृहात उडलेल्या दंगलीदरम्यान कापड जाळण्यात आले असल्याचेही तिचे म्हणणे आहे.
आज १२ दिवसांनी सुटका झाली. या कारागृहातून सुटल्याच्या आनंदात तिने आईला कडकडून मिठी मारून हंबरडा फोडला आणि ती निघून गेली. मात्र मंजूळाची किंकाळी कानात घुमते आहे, असे तिने सांगितले.