इंद्राणी मुखर्जीचा आत्महत्येचा प्रयत्न?

By admin | Published: October 3, 2015 03:59 AM2015-10-03T03:59:57+5:302015-10-03T09:39:42+5:30

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने शुक्रवारी मानसिक तणावावरील औषधी गोळ्यांचा प्रमाणापेक्षा अधिक डोस घेतल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ असून

Indrani Mukherjee's suicide attempt? | इंद्राणी मुखर्जीचा आत्महत्येचा प्रयत्न?

इंद्राणी मुखर्जीचा आत्महत्येचा प्रयत्न?

Next

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने शुक्रवारी मानसिक तणावावरील औषधी गोळ्यांचा प्रमाणापेक्षा अधिक डोस घेतल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ असून, तिला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले
आहे. गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन इंद्राणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का आणि या गोळ्या तिला कोठून मिळाल्या, याबाबत चौकशी करण्याचे आदेश कारागृह महानिरीक्षकांनी दिले आहेत.
भायखळा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या इंद्राणीला शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने दुपारी २च्या सुमारास जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासून ती बेशुद्ध आहे. त्यामुळे तातडीने तिचा ‘एमआरआय’ काढण्यात आला. तथापि, ‘एमआरआय’मध्ये काहीच आढळले नाही. त्यानंतरच्या तपासण्यांत मात्र तिने गोळ्या घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
औषधे घेण्याबाबत इंद्राणी मुखर्जीने न्यायालयाकडून कोणतीही परवानगी मागितली नव्हती. घरचे जेवण घेण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज आरोपी संजीव खन्नाकडून करण्यात आला होता. मात्र त्यातून विषबाधेसारखा प्रकार होण्याची शक्यता वर्तवत सरकारी
पक्षाने त्यावर आक्षेप घेतला. गुरुवारी गुवाहाटी येथे राहणाऱ्या इंद्राणी
मुखर्जीच्या आईचे निधन झाले. ही
बातमी तिला समजल्यानंतर ती अस्वस्थ होती. या तणावातून तिची प्रकृती
अधिकच बिघडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

इंद्राणी मुखर्जीने खाल्लेल्या गोळ्यांबाबत तुरुंग प्रशासनाकडून काही हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक (कारागृह) बी.के. सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
इंद्राणीची प्रकृती बिघडल्याचे आम्हाला समजल्यानंतर निवासी डॉक्टरांनी तत्काळ तिची तपासणी केली. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.
११ सप्टेंबरपासून इंद्राणी गोळ्या घेत होती. तिने वेळोवेळी गोळ्या न घेता त्या जमा केल्या की तिला पुरवण्यात आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मानसिक तणावावर सुरु होते उपचार
मानसिक तणावावर इंद्राणीला दिवसातून एक गोळी दोन वेळा दिली जात होती. मात्र तिच्याकडे त्यापेक्षा अधिक गोळ्या कशा पोहोचल्या की, तिने गोळ्या जमा करून त्या एकाचवेळी घेतल्या, हे शोधण्यासाठी कारागृह महानिरीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी २३ एप्रिल
२०१२ रोजी शीना बोराची हत्या झाली. या प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम रॉय यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे.
इंद्राणीवर सीसीयूमध्ये (कार्डियाक केअर युनिट) उपचार सुरू आहेत. तिच्या पोटातील पाणी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. इंद्राणी अजूनही शुद्धीत आलेली नाही.- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

Web Title: Indrani Mukherjee's suicide attempt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.