आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंद्राणी मुलांचा बळी देण्यासही तयार होती - पीटर मुखर्जी
By admin | Published: March 25, 2016 09:38 AM2016-03-25T09:38:33+5:302016-03-25T11:28:52+5:30
अतिशय महत्वाकांक्षी असलेली इंद्राणी स्वत:च्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांचा बळी देण्यासही तयार होती, असे सांगत इंद्राणीनेच कट रचून हत्या केल्याचा दावा पीटरने केला.
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २५ - इंद्राणी ही अतिशय महत्वाकांक्षी स्त्री होती, जी आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलांचा बळी देण्यासही तयार होती' असे नमूद करत इंद्राणी मुखर्जी पती व मीडिया टायकून पीटर मुखर्जीने न्यायालयात दुस-यांदा जामीन अर्ज दाखल केला. बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणात शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा माजी पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यानंतर पीटर मुखर्जी यांनाही अटक करण्यात आली. इंद्राणीनेच कट रचून शीनाची हत्या केल्याचा दावाही पीटर यांनी केला.
मात्र या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगत गेल्या महिन्यात पीटर यांनी जामीनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर ते तुरूंगातच आहेत. अखेर आज पीटर मुखर्जी यांनी पुन्हा जामीनासाठी अर्ज करत आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून इंद्राणीनेच कट रचून हत्या केल्याचा दावा केला.
' इंद्राणी खूपच महत्वाकांक्षी होती. आपली महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी ती आपल्या मुलांचा त्याग करण्यासाठीही तयार होती' असे असं पीटर मुखर्जीने जामीन अर्जात म्हटले आहे. ' इंद्राणी खूप चालाख होती. शीनाचा काटा काढण्यासाठी इंद्राणीने तिच्यासमोर भूतकाळातील घटना विसरून पुन्हा मैत्री केल्याच नाटक केलं आणि शीनाला त्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं' असंही पीटरने जामीन अर्जात नमूद केले आहे.
दरम्यान येत्या ३१ मार्च रोजी पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. सीबीआयदेखील यावेळी न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहे.
पीटरला १९ नोव्हेंबर २०१५ला या प्रकरणाच्या कटात कथितरीत्या सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. इंद्राणी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने एका कारमध्ये कथितरीत्या शीनाची गळा दाबून हत्या केली होती आणि तिचा मृतदेह जाळल्यानंतर रायगड जिल्ह्यातील जंगलात त्याची विल्हेवाट लावली होती