उमेदवारी नाही कळताच, 'या' नेत्याने महिनाभरातच धरली राष्ट्रवादीची वाट !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:42 PM2019-10-03T15:42:53+5:302019-10-03T15:45:16+5:30
आता इंद्रनील यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी महिन्याच्या आतच राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना पक्षांतर आणि उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. या गडबडीत आयारामांची चांदी होताना दिसत आहे. परंतु, अनेक ठिकाणी आयारामांना अपेक्षीत वागणूक किंवा उमेदवारी मिळत नसल्याने नाराजी निर्माण होत आहे. असाच काहीसा अनुभव राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या नेत्याला आला आहे.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सत्ताधारी पक्षाच्या मेगा भरतीत इंद्रनील देखील सामील झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. पुसदमधून उमेदवारी मिळणार या उद्देशाने इंद्रनील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचा सुगावा लागताच इंद्रनील यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
पुसद मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. येथून भाजपने विधान परिषदेचे आमदार निलय नाईक यांना दिली आहे. 2014 मध्ये आघाडीसाठी प्रतिकूल स्थिती असताना देखील मनोहरराव नाईक निवडून आले होते. परंतु, तिकीटासाठी त्यांच्या मुलाने शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात होता. आता इंद्रनील यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी महिन्याच्या आतच राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे.