इंद्राणीचा नवरा पीटर मुखर्जीही अटकेत

By admin | Published: November 20, 2015 04:04 AM2015-11-20T04:04:08+5:302015-11-20T04:04:08+5:30

शीना बोरा या पोटच्या मुलीची हत्या केल्याचे आरोपपत्र इंद्राणी मुखर्जीसह अन्य दोघांविरुद्ध दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत सीबीआयने इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही गजाआड केले.

Indrani's husband, Peter Mukherjee too | इंद्राणीचा नवरा पीटर मुखर्जीही अटकेत

इंद्राणीचा नवरा पीटर मुखर्जीही अटकेत

Next

मुंबई : शीना बोरा या पोटच्या मुलीची हत्या केल्याचे आरोपपत्र इंद्राणी मुखर्जीसह अन्य दोघांविरुद्ध दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत सीबीआयने इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही गजाआड केले.
इंद्राणीचा माजी पती संजीव खन्ना आधीपासूनच अटकेत असून आरोपपत्रात त्याचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी न्यायालयात आरोपपत्र दाखल करणाऱ्या सीबीआयने सायंकाळी उशिरा पीटरला अटक करून त्याची चौकशी सुरु केली. या वेगवान घडामोडीतून आजवरचा तपास, मुंबई पोलिसांची त्यातील भूमिका, सीबीआयला पीटरच्या अटकेसाठी लागलेला वेळ आणि आरोपपत्र दाखल होण्याआधी न झालेली चौथी अटक अशा अनेक मुद्द्यांबाबत संशयकल्लोळ सुरू झाला आहे. पीटरच्या अटकेनंतर आता शीना हत्याकांडात इंद्राणी आणि तिचे आजी-माजी मिळून दोन पती गजाआड अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी वारंवार झालेल्या चौकशीत आधी मुंबई पोलिसांना व नंतर सीबीआयला पीटरने दिलेल्या अनेक तपशिलांमध्ये वा उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पीटरला सीबीआयने सखोल चौकशीसाठी गजाआड केले आहे. ही अटक दोन कारणांनी नाट्यपूर्ण ठरली. एकतर पीटरला अटक झाल्याबाबत त्याचे वकील महेश जेठमलानीही सायंकाळी ७.४० पर्यंत अंधारात होते.
त्याआधी पीटरवर सीबीआयच्या प्रश्नांच्या फैरी झडत असताना पीटर व जेठमलानी यांचा फोनवर संपर्कही झाला होता. पण अटकेचा अंदाज दोघांनाही आला नाही. शीना हत्याकांडात जागल्याची भूमिका बजावणारा पीटरचा मुलगा राहुल हा सायंकाळी वडिलांना झालेल्या अटकेवेळी हजर होता. इंद्राणीला अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्वत: चौकशी केली होती. इंद्राणीचे सर्व पती (आजी-माजी), ड्रायव्हर आणि अन्य कुटुंबियांची मारियांनी चौकशी केली. तेव्हा पीटरला अटक झाली नाही. मारियांना पीटरबाबत काहीच संशयास्पद आढळले नव्हते की त्याला पाठिशी घालण्यात हितसंबंध होते, सीबीआयलाही पीटरच्या अटकेसाठी वेळ का लागला, गुरुवारी सीबीआयला काय सापडले, ज्याच्या बळावर त्यांनी पीटरला गजाआड केले, आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी पीटरला अटक करून त्याचाही आरोपपत्रात समावेश करण्यात का आला नाही, असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मुंबई पोलिसांतील कोणताही वरिष्ठ अधिकारी या विषयावर उघड बोलण्यास तयार नाही. पण आमच्या चौकशीत, मला खुनाबाबत काहीही माहिती नाही, हेच पीटर सांगत होता, व ते खोटे आहे, हे स्पष्ट करणारा पुरावा हाती लागत नव्हता, असे एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
रायच्या कबुलीजबाबातून पीटरची खुनाच्या बाबतीतील भूमिका सीबीआयला लक्षात आल्यानंतर त्याची परिणती पीटरच्या अटकेत झाली असावी, असा एक तर्क आहे.

Web Title: Indrani's husband, Peter Mukherjee too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.