"इंदू सरकार" विरोधात काँग्रेस आक्रमक, मधूर भांडारकरांना कडेकोट सुरक्षाव्यवस्था
By Admin | Published: July 17, 2017 02:20 PM2017-07-17T14:20:38+5:302017-07-17T14:20:38+5:30
मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मधूर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटावरुन सध्या वादंग सुरु असून काँग्रेस कार्यकर्ते चित्रपटाच्या प्रमोशनाचे कार्यक्रम उधळून लावत आहे. यामुळेच राज्य सरकारने मधूर भांडारकरांना सुरक्षा पुरवली आहे. शनिवारी पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावली होती. पुण्यापाठोपाठ रविवारी नागपुरातही चित्रपटविरोधात काँग्रेसने आंदोलन केल्याने भांडारकर यांना दोन वेगवेगळया ठिकाणी आयोजित कलेली पत्रकार परिषद रद्द करावी लागली. या प्रकारामुळे संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का?’ असा सवाल केला होता.
संबंधित बातम्या
चित्रपटाला होणारा विरोध आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची तीव्र आंदोलनं लक्षात घेत राज्य सरकारने मधूर भांडारकर यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल.
राहुल गांधींकडे व्यक्त केला संताप
आणीबाणीवर आधारित ‘इंदू सरकार’ चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संतापलेल्या भांडारकर यांनी राहुल गांधींना ट्विट करून ‘या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?’ असा थेट सवाल केला.
Dear @OfficeOfRG after Pune I have 2 cancel today's PressCon at Nagpur.Do you approve this hooliganism? Can I have my Freedom of Expression? pic.twitter.com/y44DXiOOgp
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 16, 2017
चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भूमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने ‘स्पॉन्सर’ केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणुकांच्या वेळी प्रदर्शित केला असता, असे भांडारकर यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांनी बोलताना सांगितले.
‘सेन्सॉर’ने या चित्रपटात १७ ‘कट’ करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ‘ट्रिब्युनल’मध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहिले आहे, असे विचारत नाहीत. मग चित्रपटाबाबतच का विचारणा होते, असा सवालही भांडारकर यांनी उपस्थित केला.
"हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक असून, फक्त ३० टक्केच वस्तुस्थितीवर आधारित आहे. अशातही विरोध होत असेल, तर ही माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. माझे तोंड काळे करून किंवा अंगावर शाई फेकून तुम्ही इतिहास बदलू शकणार नाही", असं मधूर भांडारकर बोलले आहेत.