इंदू मिलमध्ये स्मारकासाठी अवघी २.८१ हेक्टर जमीन!
By admin | Published: April 14, 2017 02:09 AM2017-04-14T02:09:16+5:302017-04-14T02:09:16+5:30
इंदू मिलची जमीन १२ एकर असली तरी सीआरझेडमुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अवघ्या २.८१ हेक्टर जमीनीवरच उभे राहू शकेल. इंदू मिलमधील २.३ हेक्टर
मुंबई: इंदू मिलची जमीन १२ एकर असली तरी सीआरझेडमुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अवघ्या २.८१ हेक्टर जमीनीवरच उभे राहू शकेल. इंदू मिलमधील २.३ हेक्टर जमिनीवर सीआरझेडचे आरक्षण असल्याने तेथे बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे भविष्यात हे आरक्षण उठवले तरी बाबासाहेबांच्या स्मारकाव्यतिरिक्त तेथे अन्य काहीही उभे करण्यास आमचा विरोध राहील, अशी भूमिका या प्रश्नी सतत पाठपुरावा करणारे चंद्रकांत भंडारे यांनी जाहीर केली आहे.
केंद्र सरकारने मात्र ही जमीन हस्तांतरण करताना सीआरझेडचे आरक्षण न बदलता १२ एकर जमीनी राज्य सरकारकडे हस्तांतरीत केली आहे. राज्य सरकारनेही जमीन स्वीकारली आहे. तथापि, भविष्यात सीआरझेडचे आरक्षण उठवून अन्य कोणतेही बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्यास तो प्रयत्न हाणून पाडण्याचा इशाराही चंद्रकांत भंडारे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे शैलेंद्र कांबळे यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. मागच्या सरकारने आंबेडकरांच्या स्मारकाचे बिल सभागृहात न मांडल्याने त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. तथापि, जुलै २०१६मधील एका पत्राची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या ४ हजार ८४१४.८३ चौरस मीटर एवढी संपूर्ण जमीन राखीव ठेवण्याचा निर्णय अटर्नी जनरल यांचा सल्ला घेऊन घेतला. या संदर्भातील वस्तुस्थितीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप भंडारे, कांबळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
जनतेची फसवणूक
इंदू मिल जमिनीचे हस्तांतरण / अधिग्रहण व्यवहार पूर्ण न करता ११ आॅक्टोबर २०१५ रोजी आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपुजन झाले. त्यानंतर जमीन अधिग्रहण करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. संपूर्ण इंदू मिलच्या जमिनीवर स्मारकाचे भूमिपुजन करुन नंतर जागा आरक्षित असल्याचे सांगून सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप भंडारे, कांबळे यांनी केला.