अधीर पावलांना इंदू मिलची ओढ

By admin | Published: October 12, 2015 05:16 AM2015-10-12T05:16:10+5:302015-10-12T05:16:10+5:30

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिकांनी चैत्यभूमी आणि इंदू मिल परिसरात एकच गर्दी केली

Indu Mill's affection for impatient steps | अधीर पावलांना इंदू मिलची ओढ

अधीर पावलांना इंदू मिलची ओढ

Next

मुंबई: इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भीमसैनिकांनी चैत्यभूमी आणि इंदू मिल परिसरात एकच गर्दी केली. आबालवृद्धांची ही गर्दी इंदू मिलच्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे सावरकर मार्गावर कोणालाच प्रवेश दिला गेला नाही, त्यामुळे अनेक भीमसैनिकांचा हिरमोड झाला.
‘आम्ही भूमिपूजनासाठी आलो, इथून आम्हाला काय दिसणार, मग इतका गाजावाजा करुन बोलावलंच कशाला,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच बॅरिकेडजवळच्या भीमसैनिकांच्या समूहाने पोलिसांवर केली. यावर ‘पंतप्रधानांचा ताफा जाताच पाच वाजता सर्वांना
आत प्रवेश दिला जाईल,’
अशा शब्दांत पोलीस आणि
उपस्थित भाजपा समर्थक भीमसैनिकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. भूमिपूजनाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसा भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अखंड जयघोष सुरू होता. (प्रतिनिधी)
स्मारकाचे भूमिपूजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार, खा. रामदास आठवले, आ. जोगेंद्र कवाडे, आ. भाई गिरकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भारिप नेते प्रकाश आंबेडकर, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.स.मदान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उरण : जेएनपीटी बंदराच्या चौथ्या टर्मिनलच्या पायाभरणीचा कार्यक्रम रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल दिघीकर, पोर्ट आॅफ सिंगापूरचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. अवघ्या १२ मिनिटांसाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या खासदारांनी पाठ फिरविली.
जेएनपीटी बंदरात आयोजित कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार तयारी केली होती. माध्यमांच्या प्रतिनिधींसह निवडक सुमारे ३०० निमंत्रकांनाच या कार्यक्रमाची निमंत्रणे देण्यात आली होती, तसेच कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये, म्हणूनच सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलीस यंत्रणेकडून ४ डीसीपी, ५ एसीपी, ७७१ पोलीस कर्मचारी आणि दोन एसआरपी प्लाटून तैनात होते. दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जेएनपीटी बंदरात हेलिकॉप्टरमधून आगमन झाले. त्यानंतर कार्यक्रम स्थळी केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी यांनी जेएनपीटी बंदरावर बनविण्यात आलेला विकास आणि भविष्यातील योजनांची चार मिनिटांचा माहितीपट पाहिला. त्यानंतर जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनलच्या शिलान्यासाची फीत कापण्यात आली. (वार्ताहर)
पंतप्रधानांना काळे झेंडे
उरण तालुका सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करळ फाटा येथे काळे झेंडे दाखविण्यात आले. उरणमधील चांदणी चौकात भरलेल्या मेळाव्यासाठी भाजप नेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष रविशेठ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत ठाकूर यांनी, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देणार असून भूखंड वाटपाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली.
सावरकर मार्गाकडील वाहतूक रोखली
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांनी रविवारी दुपारपासून वीर सावरकर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक अडवली. शिवाजी पार्कपासून थेट सिद्धिविनायक मंदिरापर्यंतच्या परिसरात सावरकर मार्गाला मिळणारे रस्त्यावरील वाहतूक बॅरीकेड टाकून रोखण्यात आले. चैत्यभूमी ते इंदू मिलपर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक पंतप्रधानांचा ताफा परतीच्या मार्गाला लागेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
चैत्यभूमीजवळील
स्टॉलही हटवले
भूमिपूजनासाठी इंदू मिलकडे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चैत्यभूमीला भेट देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पंतप्रधान येणार म्हणून शनिवारी सायंकाळपासूनच पोलिसांनी चैत्यभूमी परिसरात बंदोबस्त वाढविला होता. चहा, वडापावचे छोटे ठेले हटविण्यात आले होते. शिवाय चैत्यभूमिबाहेरील
हार-फुले आणि भीमसाहित्यांची विक्री करणारे स्टॉल्सदेखील शनिवारीच हटविण्यात
आले.
दादर झाले फेरीवालामुक्त
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दादर संपूर्णपणे फेरीवाला मुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. एरवी रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दादरच्या पदपाथांवर केवळ फेरीवाल्यांचे साम्राज्य असते. जिथे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील असते. अशा प्लाझा ते शिवसेना भवन परिसरातील पदपाथांनी मोकळा श्वास घेतला.

Web Title: Indu Mill's affection for impatient steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.