खासदार सुजय विखेंचा 'डाव फसला', इंदुरीकरांनी भाजप प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 09:34 PM2019-09-14T21:34:49+5:302019-09-14T21:57:05+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली
अहमदनगर - सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या किर्तनातून जनप्रबोधन करणाऱ्या आणि तरुणांना राजकारणापासून दूर राहणाऱ्या इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, सोशल मीडियावरही इंदुरीकर महाराजांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटीझन्सने इंदुरीकरांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर, इंदुरीकर महाराजांनी स्वत: स्टेजवरील भेटीचं रहस्य उलगडलं.
संगमनेर येथील महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवृत्ती महाराज देशमुख यांना भाजपाचा गमजा गळ्यात घालण्यासाठी आग्रह केला होता. मात्र, महाराजांनी पुढे येऊन सुजय यांचा हात थांबवला. तसेच, सुजय विखेंकडून देण्यात येणारा भाजपाचे कमळ चिन्ह असलेला गमजाही घालण्यास विरोध केला. यावेळी, सुजय यांनी महाराजांना भाजपात घेण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र, महाराजांनी कानावर हात लावत मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांनाही नकार दिला. अखेर सुजय विखेंचा डाव फसला अन् महाराजांनी भाजपा प्रवेशापासून स्वत:ची सुटका करुन घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. भाजपात सध्या मेगा भरती सुरू असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसेल यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. त्यातच, संगमनेरमधील महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर चक्क निवृत्ती महाराज इंदूरीकर पाहायला मिळाले. आपल्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराजांचे स्वागत केले. तसेच, महाराजांसोबत चर्चाही केली आहे. विशेष म्हणजे या महाजनादेश यात्रेला महाराज उपस्थित राहिले, पण भाजपा प्रवेश केल्याची किंवा आपली कुठलिही राजकीय भूमिका इंदुरीकर यांनी जाहीर केली नाही.