VIDEO: इंदुरीकर महाराज कॅमेरांवर संतापले, मग धनंजय मुंडेंना करावी लागली मध्यस्थी अन् महाराजांना ऐकावंच लागलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:40 AM2022-09-09T08:40:58+5:302022-09-09T08:41:24+5:30
Indurikar Maharaj: कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका प्रवचनाच्या कार्यक्रमात माध्यमांच्या कॅमेरांवर इंदुरीकर महाराज संतापलेले पाहायला मिळाले.
Indurikar Maharaj: कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात एका प्रवचनाच्या कार्यक्रमात माध्यमांच्या कॅमेरांवर इंदुरीकर महाराज संतापलेले पाहायला मिळाले. कॅमेरे बंद केले नाहीत आणि प्रवचनानंतर काही बातम्या प्रकाशित झाल्या तर आयोजकांनी याची जबाबदारी घ्यावी असा संताप इंदुरीकर महाराजांनी भर व्यासपीठावरुन व्यक्त केला. इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी मग कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आपलं प्रवचन सुरू केलं. ही सगळी घटना कॅमेरात कैद झाली आहे.
बीडमध्ये आयोजित एका कीर्तन कार्यक्रमावेळी हा प्रसंग घडला आहे. बीडच्या परळी तालुक्यात नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचा समारोप कार्यक्रम इंदुरीकर महाराजांच्या किर्तनानं झाला. यावेळी इंदुरीकर महाराज आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये खटका उडाला. इंदुरीकर महाराज यांनी यावेळी माध्यमांचे कॅमेरे बंद करण्याचं आवाहन केलं. "कीर्तनामधलं कुठलंतरी वाक्य उचलायचं आणि ते दुसऱ्या कुठल्यातरी वाक्याला जोडायचं. मग ते फेसबुक, यूट्यूबवर अपलोड करायचं याची फळं आम्हाला भोगावी लागतात. अजूनही मी भोगतोय", असा संताप इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जोपर्यंत कॅमेरामन खाली उतरत नाही तोवर त्यांना इशारा देत राहिले. आयोजकांनाच व्हिडिओ पडला तर जबाबदारी घेणार का? असं म्हणत आयोजकांनाही सुनावलं.
VIDEO: इंदुरीकर महाराज माध्यमांच्या कॅमेरावर संतापले, मग धनंजय मुंडेंना करावी लागली मध्यस्थी; बीडमधील नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातील प्रकार pic.twitter.com/QZjjtkU4UN
— Lokmat (@lokmat) September 9, 2022
इंदुरीकर महाराजांची समजूत काढण्यासाठी अखेर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांना मध्यस्थी करावी लागली. प्रसार माध्यमांचे कॅमेरे त्यांना जे काम करायचं आहे ते करतील तुम्ही अध्यात्माचं काम सुरू ठेवा, असं आवाहन करत प्रवचन सुरू ठेवण्याची विनंती केली. धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंकर कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कार्यक्रम पुन्हा सुरू केला.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे या व्हिडिओमध्ये दिसत नसले तरी त्यांचा आवाज ऐकू येत आहे. धनंजय मुंडे यांनी माइकवरुन इंदुरीकर महाराजांची समजूत काढली. "आठ दिवस कार्यक्रम थेट प्रक्षेपण करत चालला आणि नेमका इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम दाखवला नाही तर त्याची काय परिस्थिती होईल त्याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो. त्यांना जो व्यवसाय करायचा असेल तो करू द्या. आपण अध्यात्माचं काम करू", असं धनंजय मुंडे म्हणाले.