कीर्तनातील 'त्या' वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांनी केला मोठा खुलासा; कारवाई टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 05:13 PM2020-02-20T17:13:07+5:302020-02-20T17:27:28+5:30
Indurikar Maharaj: खुद्द इंदोरीकर महाराजांनी या प्रकरणात माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले होते
अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या इंदोरीकर महाराजांच्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. मुला-मुलींच्या जन्मावरुन केलेल्या विधानामुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज अडचणीत आले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूमाता ब्रिगेड आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती.
या प्रकरणात अहमदनगरच्या जिल्हा चिकित्सक विभागाने इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवली होती. त्यावर इंदोरीकर महाराजांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये ते म्हणतात की, मी तसे बोललोच नाही. ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही असं त्यांनी सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र एका मुंबई येथील वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. त्यांना कोठून पुरावे मिळाले याची विचारणा केलेली आहे. त्यांचे अद्याप उत्तर आले नाही. त्यामुळे कारवाई लगेच शक्य नाही असं अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केलं आहे.
खुद्द इंदोरीकर महाराजांनी या प्रकरणात माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले होते. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोललो आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तरीही भूमाता ब्रिगेडने यावर आक्षेप घेत त्यांच्यावर ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिला होता. यावरुन तृप्ती देसाई यांच्याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता.
इंदोरीकरांनी जाहीर केलेल्या माफीपत्रात म्हटलं होतं की, मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे. माफी मागताना त्यांनी सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
इंदोरीकर महाराजांची शैली कीर्तन परंपरेला बाधा आणणारी ; सदानंद मोरे
मनसेचा तृप्ती देसाईंना इशारा; इंदोरीकर महाराजांना काळं फासण्याचा प्रयत्न केल्यास...
'चार दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर इंदोरीकर महाराजांना काळं फासणार'
मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोललो आहे- इंदोरीकर
इंदोरीकर महाराजांची एखादी चूक असती तर त्यांना माफ केलं असतं :तक्रार देण्यावर तृप्ती देसाई ठाम