राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय म्हणायचे इंदुरीकर महाराज?; 'या' नेत्याचं भाषण नाद खुळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:41 PM2020-02-17T17:41:25+5:302020-02-17T17:56:45+5:30
सध्या इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावरुन अनेकांकडून टीका होत आहे. अशातच इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनार्थही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.
मुंबई - गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अडचणीत आलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यातच इंदुरीकर महाराज राजकीय नेत्यांच्या भाषणाबद्दल काय बोलायचे? याचा व्हिडीओ समोर आला आहे.
यामध्ये बोलताना इंदुरीकर महाराज म्हणतात की, माईक तुटेपर्यंत भाषण करणारी माणसं आहे, वायरी तुटल्या तरी बोलतात, स्व. बाळासाहेबांनंतर भाषणाची लकब कोणालाच जमली नाही, तसे कपडे घालाल, दाढी राखाल पण ते पुन्हा होणे नाही, कोणी उठायचं काहीही बरळायचं त्याला काही किंमत आहे, सचिवाने लिहायचं तुम्ही बोलायचं त्याला किंमत काय आहे, बाळासाहेबांच्या व्यासपीठावर कधी टाचण दिसलं का? खुर्चीहून उठायचं अन् सुरु, ती ताकदच आतमधून होती. आपोआप शब्द बाहेर पडत होते, उभं राहायल्यावर टाळी वाजत होती, ते गप्प बसेपर्यंत टाळी वाजायची. वकृत्वात ताकद होती असं ते म्हणाले.
त्यानंतर विरोधकांनाही हसायला लावेल असं भाषण विलासराव देशमुखांनंतर कोणाला जमलं नाही, सत्ताधारी असो वा विरोधक विलासरावांच्या भाषणावेळी खळखळून हसत होते. त्यानंतर दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं भाषण स्व. आर. आर पाटील यांच्यानंतर कोणाला जमलं नाही, ह्दयाला घाम फोडणारं भाषण स्व. गोपीनाथ मुंडेनंतर कोणाला जमलं नाही, तर या सगळ्यांचं जिरवणारं पवारसाहेबांसारखं भाषण कोणाला जमलं नाही, नाद खुळा असं सांगत ही माणसं असतात ती इतरांच्या तुलनेत बुद्धीने दहा दहा वर्ष पुढे असतात अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी या नेतेमंडळींचे कौतुक केले.
सध्या इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या विधानावरुन अनेकांकडून टीका होत आहे. अशातच इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि समर्थनार्थही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, इंदुरीकर महाराजांची दिवसाला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात. प्रवचनातून ते शिक्षकांचं आणि पाण्याचं महत्त्व मांडतात. पण त्यांनी महिलांबद्दल असं म्हणायला नको होतं. एक वाक्यानं सगळं माणसांचं गेलं, असं होत नाही. मीसुद्धा इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला जातो. एकदा पाच मिनिटं बसायच्या उद्देशानं गेलो होतो, मी तासभर थांबलो. इतकं मार्मिकपणे ते समाजातल्या चुकांवर बोट ठेवत आहेत. एका चुकीमुळे त्यांचं सगळं गेलं. एका वाक्यामुळे व्यक्ती खराब होत नाही. इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील
'इंदुरीकर महाराज, तुम्ही चांगलं काम करताय, फक्त 'ही' एक गोष्ट नक्की करा!
आय सपोर्ट इंदुरीकर महाराज... 'तमाशापुढं बसणारा आज किर्तनाला बसतोय'
इंदुरीकर महाराज म्हणतात; 'कीर्तन सोडून शेती करेन; खूप मनःस्ताप झाला!'
इंदुरीकर म्हणाले, वादाचा मला व माझ्या कुटुंबीयालाही त्रास; शूटिंगलाही घातली बंदी