मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; पुढील ५ दिवसांचे कार्यक्रम सर्व रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 09:47 PM2023-10-29T21:47:28+5:302023-10-29T22:02:20+5:30
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ढासळली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला राज्यभरातून अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्यात आता इंदुरीकर महाराजांनीमराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. इंदुरीकर महाराज यांनी उद्यापासून ५ दिवस कोणतेही कार्यक्रम न करण्याचा आणि कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे. इंदुरीकर महाराजांचे रोजचे नियोजित कार्यक्रम ठरलेले असतात. पण जालन्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी त्याला पाठिंबा देत पाच दिवस कीर्तनाचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसरा टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे, जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे हे समजेल. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेवू. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नसल्याचं जरांगे पाटली यांनी सांगितले.