इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 01:00 PM2020-02-17T13:00:34+5:302020-02-17T13:14:43+5:30
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनीही आता इंदुरीकरांच्या महाराजांच्या विधानावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईः कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मत व्यक्त करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. त्यानंतर भाजपानं त्यांची बाजू उचलून धरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनीही आता इंदुरीकरांच्या महाराजांच्या विधानावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराजांची दिवसाला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात. प्रवचनातून ते शिक्षकांचं आणि पाण्याचं महत्त्व मांडतात. पण त्यांनी महिलांबद्दल असं म्हणायला नको होतं.
एक वाक्यानं सगळं माणसांचं गेलं, असं होत नाही. मीसुद्धा इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला जातो. एकदा पाच मिनिटं बसायच्या उद्देशानं गेलो होतो, मी तासभर थांबलो. इतकं मार्मिकपणे ते समाजातल्या चुकांवर बोट ठेवत आहेत. एका चुकीमुळे त्यांचं सगळं गेलं. एका वाक्यामुळे व्यक्ती खराब होत नाही. इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे.
इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य करायला नको होतं. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका, त्याची राख करू नका, असंही चंद्रकांत पाटील माध्यमांना उद्देशून म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते वारंवार खोटे बोलतात. आम्ही हे सरकार पाडणार नसून हे सरकार स्वतःहूनच पडले, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. कायद्याचा धाक राहण्यासाठी फडणवीसांनी खूप कष्ट घेतले होते. आता कायद्याचा धाक राहिला नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. दरम्यान, मनस्ताप सहन कराव्या लागल्या इंदुरीकर महाराजांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्या अनेकांनी स्वत:हून व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.
इंदुरीकर महाराजांचे हजारो व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. त्यांना मिळालेले व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतात. अनेक जण त्यांच्या कीर्तनाचं चित्रिकरण करतात. त्यानंतर ते स्वत:च्या यूट्यूबवर अपलोड करुन लाखो रुपये कमावतात. व्हायरल झालेल्या याच व्हिडीओंमुळे इंदुरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी यूट्यूब चॅनेल चालवणाऱ्यांना थेट इशारा दिला. याचा धसरा घेऊन यूट्यूब अनेक चॅनेल चालवणाऱ्या अनेकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडीओ डिलीट करण्यास सुरुवात केली.
कीर्तनच्या माध्यमातून अनेक विषयांवर परखड मतं मांडणारे इंदुरीकर महाराज मुला-मुलींच्या जन्माबाबत केलेल्या विधानावरून वादात साडपले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.