औद्योगिक वसाहती वायफाय करणार --थेट संवाद

By admin | Published: November 4, 2015 10:11 PM2015-11-04T22:11:55+5:302015-11-05T00:10:12+5:30

एक्स्पोर्ट हाऊस, डिजिटल एमआयडीसीचे नियोजन : सचिन पाटील

Industrial Colonies Wifi - TheTeat Dialogues | औद्योगिक वसाहती वायफाय करणार --थेट संवाद

औद्योगिक वसाहती वायफाय करणार --थेट संवाद

Next

क्लस्टरच्या माध्यमातून औद्योगिक वसाहती वायफाय करणार आहे. विद्युत स्वनिर्मिती, एक्स्पोर्ट हाऊस, डिजिटल एमआयडीसी, मोठे ट्रेनिंग सेंटर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे कोल्हापूर फौन्ड्री अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर फौन्ड्री अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग क्लस्टरच्या अध्यक्षपदी उद्योजक सचिन पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला थेट संवाद...

 

प्रश्न : फौन्ड्री क्लस्टरची सुरुवात कधी झाली?
उत्तर : सन २००३ साली शासकीय कार्यालय आणि जिल्हा उद्योग केंद्रातून क्लस्टरबाबत माहिती मिळाली. क्लस्टरच्या माध्यमातून उद्योगांचा विकास होतो, हे समजले. यासाठी माहिती घेण्याचे काम त्याकाळी ज्येष्ठ उद्योजकांनी सुरू केले. शिरोली, गोकुळ शिरगाव, इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये चर्चासत्र आयोजित केले. तज्ज्ञांच्या माध्यमातून माहिती मार्गदर्शन घेतले. क्लस्टरसाठी शासनाचा निधी मंजूर होतो हे समजले, म्हणून सर्व उद्योजकांना बरोबर घेऊन हे क्लस्टर करण्याचे ठरविले आणि स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही)च्या अखत्यारित शिरोली, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर इंजिनिअरिंग, छ. शाहू शिरोळ, एल. के. अकिवाटे जयसिंगपूर, या पाच ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींना एकत्रित घेऊन कोल्हापूर फौन्ड्री अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग क्लस्टरची जानेवारी २००६ मध्ये स्थापना केली. यासाठी एक कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक श्री. रामप्रताप झंवर यांना केले आणि तिथून क्लस्टरला सुरुवात झाली.
प्रश्न : क्लस्टरचे एकूण बजेट किती?
उत्तर : फौन्ड्री आणि इंजिनिअरिंग क्लस्टरचे एकूण ४२ कोटी ३६ लाखांचे हे क्लस्टर आहे. यात गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन १६ कोटी १२ लाख, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन १४ कोटी ८८ लाख, एल. के. अकिवाटे जयसिंगपूर ६ कोटी ९० लाख, छ. शाहू इंडस्ट्रीयल शिरोळ ३ कोटी ४0 लाख, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन ७० लाख असा निधी मंजूर झाला आहे. यात केंद्र शासनाचा ७५ टक्के, राज्य शासनाचा १० टक्के निधी आला आहे आणि उद्योजकांनी १५ टक्के रक्कम स्वनिधी घातला आहे, सन २००७ साली एल. के. अकिवाटे यांना क्लस्टरचे अध्यक्ष केले. त्यांनी रामप्रताप झंवर, बापूसाहेब जाधव, प्रकाश राठोड, जी. बी. वझे, राजीव पारीख, डी. डी. पाटील, राजेंद्र भाटवडेकर, नयन सामाणी, आर. पी. पाटील, अशोकराव माने, आप्पासाहेब धुळाज, संजीव पोतदार, प्रसाद मंत्री यांना बरोबर घेऊन मुंबई, दिल्लीला जाऊन राजकीय लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आणि शर्थीचे प्रयत्न करून हे क्लस्टर मंजूर केले.
प्रश्न : क्लस्टरचा फायदा काय आणि कधी पूर्ण होईल?
उत्तर : फौन्ड्री आणि इंजिनिअरिंग क्लस्टरमुळे जिल्ह्यातील उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे. शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत सॅन्ड रिक्लेमेशन प्रकल्प उभारले आहेत, या ठिकाणी फौन्ड्रीतील दररोज बाहेर पडणारी हजारो टन वेस्ट सॅन्डवर प्रक्रिया करून ही सॅन्ड पुन्हा वापरात आणली जाणार आहे, त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहे आणि भविष्यात उद्भवणाऱ्या खनिज उत्खननाबाबतचा प्रश्न गंभीर आहे, त्याला हा पर्याय आहे, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. डिसेंबरमध्ये उद्घाटन होऊन पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तसेच लघु उद्योजकांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर दोन्ही ठिकाणी उभारण्यात आले आहेत, यात तयार होणारे जॉब तपासणीसाठी टेस्टिंग लॅबोरेटरी, सरफेस मशीन, लेजर इन्पेक्शन, गिअर प्रोफाईल, रेडीओग्राफी मशिनरी, अल्ट्रासोनो टेस्टिंग मशिनरीचा समावेश आहे, जॉब टेस्टिंगसाठी पुणे, मुंबईला जावे लागते ते वाचणार, कोल्हापूर इंजिनिअरिंगमध्ये कॅडकॅम सेंटर उभारले आहे. उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगरमधील छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे, या ठिकाणी स्पेशल पर्पज व्हेईकल मशिनरीचे ट्रेनिंग दिले जाणार आहे, तसेच मोठे अद्ययावत सभागृह बांधले आहे. रामभाई सामाणी सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, तर एल. के. अकिवाटे इंडस्ट्रीयल जयसिंगपूर येथे अंतर्गत मोठे रस्ते, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टरेशन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू इंडस्ट्रीयल इस्टेट शिरोळ याठिकाणी अशोकराव माने यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी मोठी पाणीपुरवठा योजना, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती या प्राथमिक सुविधा राबविल्या आहेत. हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पण हे संपूर्ण क्लस्टर पूर्ण करण्यासाठी ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष राजू पाटील, उद्यम सोसायटीचे अध्यक्ष दिनेश बुधले, ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजरी, उदय दुधाणे, कोल्हापूर इंजिनिअरिंगचे संजय अगदी, प्रताप कोंडेकर तसेच औद्योगिक संघटनांचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, उद्योजक यांचे मार्गदर्शन आणि मोठे सहकार्य लाभले आहे.
प्रश्न : सध्याची फौन्ड्री उद्योगाची परिस्थिती काय आहे?
उत्तर : गेल्या तीन वर्षांपासून फौन्ड्री उद्योगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने अमेरिका, युरोप खंडात मोठी मंदी आहे. त्याची झळ आपल्याला बसली आहे. ही मंदी अजून एक वर्ष तरी राहील, मंदीतून बाहेर पडण्यासाठी प्रामुख्याने वीज दरात कपात केली पाहिजे, बँकांचे व्याजदर कमी झाले पाहिजेत, स्कील मनुष्यबळ उपलब्ध झाले पाहिजे आणि प्रामुख्याने एकत्रित येऊन उत्पादनाचे दर ठरविले पाहिजेत, यासाठी उद्योजकांनी संघटित होणे गरजेचे आहे .
प्रश्न : भविष्यातील योजना काय आहेत?
उत्तर : सन २०१५ मध्ये सुरू असलेले क्लस्टर पूर्ण होईल आणि उर्वरीत औद्योगिक सुविधांसाठी मोठे क्लस्टर उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून औद्योगिक वसाहती वायफाय करण्याचे नियोजन आहे. विद्युत स्वनिर्मिती, एक्स्पोर्ट हाऊस, डिजिटल एमआयडीसी, मोठे ट्रेनिंग सेंटर, करण्याचे नियोजन सुरू आहे.
- सतीश पाटील
 

Web Title: Industrial Colonies Wifi - TheTeat Dialogues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.