औद्योगिक वसाहतीत कामगारांना धोका
By Admin | Published: June 10, 2016 01:27 AM2016-06-10T01:27:20+5:302016-06-10T01:27:20+5:30
लघुउद्योगामधील अपघाताच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामगार अडचणीत सापडला आहे.
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील लघुउद्योगामधील अपघाताच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामगार अडचणीत सापडला आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या असुरक्षित धोरणामुळे कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रामकमल केमिकलमध्ये कामगाराला रासायनिक प्रक्रियेदरम्यान वाफ लागल्यामुळे कुरकुंभ येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याला औषध उपचाराऐवजी घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. नंतर इतर कामगारांच्या मदतीने या कामगाराला उपचारासाठी नेण्यात आले. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील या लघुउद्योगांमध्ये अवैधरीत्या रासायनिक साठा ठेवणे, परवानगी नसणाऱ्या रसायनांवर प्रक्रिया करण्याचा प्रकारदेखील सर्रासपणे सुरू असल्याचे कामगारवर्गातून बोलले जात आहे.
कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पावर कुठल्याही प्रकारचे प्रशासनिक नियंत्रण राहिलेच नाही. प्रदूषण असो किंवा अन्य सुरक्षा साधन पुरवण्यात येणारे अपयश त्यामुळे अपघाताच्या घटना या वारंवार होतच राहतात.(वार्ताहर)
>रामकमल केमिकलमध्ये याआधीदेखील अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. कंपनी व्यवस्थापन सुरक्षेच्या सुविधा पुरवण्यात चुकारपणा करीत आहे.
कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या अपुऱ्या जागेत रासायनिक साठा ठेवल्यामुळे अपघात होत असतानादेखील यावर उपाययोजना झालेल्या नाहीत.