उद्योगपती काकासाहेब चितळे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 05:58 PM2020-02-08T17:58:51+5:302020-02-08T18:09:23+5:30
भिलवडी (ता. पलूस) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक, प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे (वय ७८) यांचे मिरज येथे हृदयविकाराने शनिवार, दि. ८ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले.
सांगली : भिलवडी (ता. पलूस) येथील मे. बी. जी. चितळे डेअरीचे संचालक, प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे (वय ७८) यांचे मिरज येथे हृदयविकाराने शनिवार, दि. ८ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निधन झाले.
शुक्रवारी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता चितळे, मुले उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे, मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर ते वडील बाबासाहेब चितळे व भावंडांसोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले. जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन, मुंबई या संस्थेचे मध्यवर्ती समिती सदस्य, जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन २ कचे माजी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे गेल्या २७ वर्षांपासून अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त व संचालक, मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, लायन्स नॅबचे आश्रयदाते अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, औद्योगिक चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या दुग्ध उद्योग क्षेत्रासह कृष्णाकाठ परिसरावर शोककळा पसरली आहे.