उद्योगपती-सिनेतारे आणून विकास होत नाही -अजित पवार
By admin | Published: February 1, 2017 02:30 PM2017-02-01T14:30:40+5:302017-02-01T14:30:40+5:30
काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले
नाशिक : काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले. मात्र ज्या नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात महापालिका दिली, त्या नाशिककरांची मनसेने निराशाच केली, तारे-तारका आणून विकास होत नाही,अशी बोचरी टीकाही अजित पवार यांनी मनसेवर केली.
गेल्या पाच वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. तेथे पक्षाने काय कामे केली, हे राज्यभरातून जनतेने जाऊन पाहावी. आम्ही पाच वर्षात केवळ विकास केला. उद्याने रस्ते सर्वच क्षेत्रात विकास केला. आम्ही करून दाखविले. मात्र नाशिकला ज्या मनसेच्या ताब्यात नाशिककरांनी सत्ता दिली. त्यांची मनसेने निराशाच केली. पाच वर्षात काही केले नाही, आता चित्रपटातील तारे-तारका आणून त्यांना नाशिकची कामे दाखविली जात आहे. नाशिककरांना मात्र हे अजूनही समजलेले नाही. मनसेने नाशिककरांना अनेक स्वप्ने दाखविली होती. मात्र ती पूर्ण करता आली नाही. पुण्यातही भाजपा-शिवसेनेने पुणेकरांना अनेक आश्वासने दिली मात्र अडीच वर्षात त्यांना ती एकही पूर्ण करता आलेली नाही. फक्त निवडणुका आल्या की ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवायचे आणि निवडणुका संपल्या की तो कोवळ ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगायचे. अच्छे दिनबाबत तर भाजपाचेच काही लोक ती आमच्या गळ्यातील हड्डी बनल्याचे सांगत आहेत. पाच वर्षात जनतेचा केवळ भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच मनसेचे आमदार-खासदार निवडणुकीत जिंकल्याचे दिसले नाहीत.