कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सोमवारपासून बंद
By Admin | Published: January 9, 2015 11:53 PM2015-01-09T23:53:27+5:302015-01-10T00:28:43+5:30
उद्योजकांचा निर्णय
कोल्हापूर :सरकारने अनुदान बंद केल्याच्या निषेधार्थ आणि अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर खाली येईपर्यंत नवीन दरवाढ करू नये या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सोमवार (दि. १२) पासून तीन दिवस बंद राहणार आहेत. याबाबतचा निर्णय उद्योजकांनी आज, शुक्रवारी घेतला.
उद्योग बंद राहिल्याने जिल्ह्यातील ५०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असून, महावितरणला शंभर कोटींच्या महसुलाला मुकावे लागण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी वीजग्राहक व औद्योगिक संघटनेचे निमंत्रक प्रताप होगाडे, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर, गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष अजित आजरी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष मोहन कुशिरे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फौंड्रीमेनचे (आयआयएफ)
अध्यक्ष विलास जाधव, इचलकरंजीच्या लक्ष्मी इंडस्ट्रीयलचे अध्यक्ष शामसुंदर मर्दा प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सरकारने अनुदान देऊनही राज्यातील विजेचे दर सव्वा रुपयाने जादा आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ३५ टक्क्यांची केलेली दरवाढ उद्योगांना मारक ठरणारी आहे. त्यामुळे या अन्यायकारक दरवाढीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकांची आज बैठक झाली.