परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:45 PM2019-12-22T17:45:06+5:302019-12-22T17:46:59+5:30
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते.
मुंबई: बीड जिल्ह्यातील परळीतीलएमआयडीसी उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय उद्योगमंत्र्यांकडून घेण्यात आला आहे. तर एमआयडीसी उभारणीसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करावी असे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे.
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी हा आदेश दिल्याचे समजते.
परळी शहराजवळील सिरसाळा भागात एमआयडीसीसाठी जमीन राखीव आहे. विधानपरिषद सदस्य असताना धनंजय मुंडे यांनी २७ जून २०१७ ला याबाबत पहिली मागणी केली होती व ०८ जुलै २०१७ ला शासन स्तरावर पहिली बैठक होऊन याबाबत भुनिवड समितीने जमीन पाहणी करावी असा निर्णय झाला होता. त्यांनतर नोव्हेंबर २०१७ मध्ये या भूनिवड समितीने जागेची पाहणी देखील केली होती. या एमआयडीसीसाठी एकूण १०१.६६ हेक्टर आर क्षेत्र अधिग्रहित करण्याचे या अगोदरच जून २०१८ मध्ये उच्चाधिकार समितीने निश्चित केलेले आहे.
परळीत सिरसाळा येथे पंचतारांकित #MIDC उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय! MIDCसाठी आवश्यक जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश उद्योगमंत्री @Subhash_Desai यांनी दिले. परळीच्या औद्योगिक विकासाची वाटचाल सुरू. प्रयत्नांना यश आले. समाधान वाटतंय. pic.twitter.com/qpV1Hd1EEQ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 22, 2019
तर मुंडे यांच्या मागणीनंतर शासनाने घेतलेल्या बैठकीत पुढील टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी शासकीय ९६.६५ हेक्टर आर जमीन तात्काळ संपादित करण्याचे आदेश देण्यात आले असून, सिरसाळा भागातील गायरान जमीन असल्यामुळे जमीन संपादनाच्या प्रक्रियेस फार वेळ लागणार नसल्याने कामाला गती मिळणार आहे.