मंगळवारपासून उद्योग बेमुदत बंद
By admin | Published: January 8, 2015 11:47 PM2015-01-08T23:47:43+5:302015-01-09T00:27:27+5:30
दक्षिण महाराष्ट्र : वीजदरवाढीच्या विरोधात उद्योजकांचा निर्णय
सतीश पाटील -शिरोली - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ४० टक्के वीजदरवाढ केल्याने ती उद्योजकांना परवडणारी नाही. त्यामुळे तोट्यात धंदा करण्यापेक्षा उद्योगच बंद करूया म्हणून वीजदरवाढीच्या विरोधात मंगळवार
(दि. १३) पासून कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील सर्व फौंड्री व इतर उद्योग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला असल्याचे उद्योजकांनी आज, गुरुवारी सांगितले.महाराष्ट्र विद्युत निर्मिती व विद्युत पारेषण यांच्या तांत्रिक गळतीचा फटका महावितरणला पर्यायाने ग्राहकांना बसत आहे. अतिरिक्त भाराच्या नावाखाली प्रत्येक महिन्याला ९०० कोटी रुपयांची वसुली सुरू असतानाच भाजप-सेना सरकारने २७ टक्के जादा वीजदराचा आणखी एक मोठा शॉक दिला आहे. यामुळे तब्बल ४० टक्के जादा दराने वीज आकारणी होणार आहे.गेली दोन वर्षे राज्यातील उद्योजक वीजदरवाढ कमी करण्याची मागणी आघाडी शासनाकडे करीत होते; पण ही वीजदरवाढ कमी झाली नाही. भाजप-सेना युतीने निवडणुकीच्या काळात वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यावर युती सरकारने वीजदरवाढ कमी करण्याऐवजी वाढविली. यामुळे सर्वसामान्य जनता भरडून निघणार आहे. कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र, छत्तीसगड या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत. हे उद्योजकांना न परवडणारे असल्याने उद्योजक परराज्यांत चालले आहेत. या उद्योजकांना थांबविण्यासाठी कोल्हापुरातील शिवसेना-भाजपच्या आमदारांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कोल्हापूरला बोलविले, बैठकही झाली; पण यात कोणतेही निर्णय झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही कोल्हापूरला आले होते; पण त्यांनीही यावर काही निर्णय दिलाच नाही. त्यामुळे उद्योजक नाराज झालेत; पण पुन्हा युती शासनाने २० टक्के वीजदरवाढ केल्याने उद्योग चालविणे शक्य नाही. मोठ्या उद्योगांना १२.५० पैसे प्रतियुनिट आणि लघु उद्योगांना १४ रुपये प्रतियुनिटने वीज आकारणी होणार आहे. त्यामुळे उद्योग बंद ठेवलेलेच बरे आहे, या निर्णयाप्रत उद्योजक येऊन, मंगळवारपासून कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व फौंड्री उद्योग व लघु उद्योग बेमुदत बंद राहणार आहेत, असे उद्योजकांनी सांगितले.
दरवाढ न परवडणारी
शासनाने पुन्हा २० टक्के वीजदरवाढ केल्याने उद्योग चालविण्यापेक्षा बंद ठेवलेले बरे. उद्योगांना ही दरवाढ न परवडणारी आहे. त्यामुळे उद्योग बेमुदत बंद ठेवणे हाच पर्याय आहे, तरच शासनाचे डोळे उघडतील.
- उदय दुधाणे, उद्योजक
एवढ्या दरवाढीमुळे फौंड्री उद्योग चालूच शकत नाहीत. उत्पादन सुरू ठेवून उद्योजकांना तोटा होणार. त्यामुळे फौंड्री उद्योग बंद राहिले, तर त्यावर आधारित पाच हजार लघुउद्योगही बंद राहून बेरोजगारी वाढणार आहे.
- राजू पाटील, उपाध्यक्ष, स्मॅक