‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 07:02 AM2023-03-03T07:02:26+5:302023-03-03T07:02:39+5:30
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या उद्योग विभागाची श्वेतपत्रिका अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काढली जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधानसभेत केली. यापूर्वी १ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्योगमंत्र्यांनी एका महिन्यात श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले होते. मात्र चार महिने उलटूनही श्वेतपत्रिका आली नाही. आता उद्योगमंत्र्यांनी यासाठी नवी डेडलाईन दिली आहे.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल.
वेदांत-फॉक्सकॉन, एअरबस आणि बल्क ड्रग पार्क, हे तीनही प्रकल्प शिंदे-फडणवीस यांच्या कालावधीत बाहेर गेलेले नाहीत. वेदांत-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाला त्यावेळच्या सरकारने इको सेन्सेटिव्ह झोनमधील जागा दाखवली. या जागेसंदर्भातील उच्चाधिकार समितीही नियुक्ती केली नाही. आमचे सरकार आल्यावर १५ जुलैला उच्चाधिकार समितीची बैठक झाली. मात्र आठ महिन्यात एक इंच जागा प्रकल्पाला महाराष्ट्रात मिळत नसेल तर तो प्रकल्प कसा करायचा, असे कंपनीने विचारले, त्यामुळेच हा प्रकल्प गेल्याचा दावा सामंत यांनी केला.
मविआ सरकारमुळेच प्रकल्प बाहेर
nदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला. केंद्राकडे हा प्रकल्प आम्हाला पाहिजे, असे त्यावेळच्या सरकारने लिहिलेले नाही, असे सांगत याचे खापरही सामंत यांनी मविआच्या सरकारवर फोडले.
nबल्क ड्रग पार्क हा प्रकल्प केंद्राने महाराष्ट्राला दिला नाही. तरी या सरकारने रायगडमध्ये हा प्रकल्प करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते एमआयडीसीमार्फत दिले जातील, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.