स्तनदा मातांसाठी ‘शिशुपोषण’ अॅप
By Admin | Published: May 18, 2016 02:30 AM2016-05-18T02:30:20+5:302016-05-18T02:30:20+5:30
आई होण्याच्या आनंदाबरोबरच नवजात शिशूचे पालन-पोषण, त्याचे आरोग्य सुदृढ व्हावे म्हणून कोणती काळजी घ्यावी
मुंबई : आई होण्याच्या आनंदाबरोबरच नवजात शिशूचे पालन-पोषण, त्याचे आरोग्य सुदृढ व्हावे म्हणून कोणती काळजी घ्यावी, अशा अनेक समस्या मातांना भेडसावत असतात. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनेक मातांना बाळाची काळजी कशी घ्यावी, याविषयी सांगायला घरी कोणी नसते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांत बाळासाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे, याची माहिती देणारे ‘शिशुपोषण’ अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपद्वारे स्तनपानाविषयीची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मिळणार आहे.
मुंबई ब्रेस्टफिडिंग नेटवर्क संस्थेने मातांना स्तनपानाविषयी माहिती देण्यासाठी सविस्तर माहिती एकत्र केली. स्तनपान कसे करावे, कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, स्तनपानाने मुलांच्या आरोग्याला कोणता उपयोग होतो अशी सर्व माहिती या अॅपवर मातांना उपलब्ध होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली. ‘टीसीएस’ने ही माहिती घेऊन ‘शिशुपोषण’ हे अॅप विकसित केले आहे.
अॅण्ड्रॉईड फोनमध्ये हे अॅप सहज उपलब्ध होणार आहे. आजकाल प्रत्येक महिलेकडे स्मार्टफोन असतो. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारची माहिती मिळत असते. पण, ही माहिती शास्त्रशुद्ध असतेच असे नाही. त्यामुळे मातांना चुकीची माहिती मिळाल्यास नुकसान होऊ शकते. अनेक महिला विभक्त कुटुंबात राहत असल्यामुळे त्यांना नीट माहिती नसते. अशा महिलांना शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठीच हे अॅप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये स्तनपानाविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. भाटे यांनी स्पष्ट केले. स्तनपान योग्य पद्धतीने दिले तर बालमृत्यूचे प्रमाण
१४ टक्केपर्यंत कमी होऊ शकते. मूल अधिक निरोगी आणि हुशार होते. (प्रतिनिधी)