आदिवासी महिलेसह नवजात अर्भकाचा मृत्यू
By admin | Published: December 6, 2015 01:58 AM2015-12-06T01:58:08+5:302015-12-06T01:58:08+5:30
शहापूर उपजिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहापुरातील आदिवासी महिलेसह तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबरला रात्री घडली.
आसनगाव : शहापूर उपजिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहापुरातील आदिवासी महिलेसह तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना २८ नोव्हेंबरला रात्री घडली. त्या आदिवासी महिलेचा पती सुनील हिलम याने संबंधित डॉक्टरांवर कारवाईसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे .
वाफे येथे राहणाऱ्या सुनील गणपत हिलम यांची पत्नी सुनीता यांच्या पोटात २८ नोव्हेंबरला अचानक दुखायला लागले म्हणून तिच्या नातेवाइकांनी रात्री ९ च्या सुमारास रु ग्णालयात दाखल केले. त्या वेळी ११ महिन्यांच्या ट्रेनिंग बेसवर काम करणाऱ्या डॉ. सुवर्णा कोवे या हजर होत्या. त्यांनी तपासणी करून तिला प्रसूती येण्यासाठी इंजेक्शन दिले. बाळंतपणाची प्रक्रि या सुरू झाल्यावर लहान बाळ पायाच्या बाजूने बाहेर आल्याने गर्भ पिशवीत अडकले. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या नातेवाइकांना सुनीताला दुसऱ्या रुग्णालयास नेण्यास सांगितले.
पुढे तिला ठाणे येथील जिल्हा रु ग्णालयात नेले असता तेथेही न घेता तिला मुंबई येथील केईएम रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू केले, परंतु सकाळी ८ च्या सुमारास आई व त्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार शहापूर उपजिल्हा रु ग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे सांगून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुनील हिलम यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
सदर महिलेच्या प्रसूतीत अडचणी असल्याचे आमच्या डॉक्टरांनी ८ दिवस आधीच पेशंटला सांगितले होते. २८ च्या रात्रीदेखील त्यांना प्रसूती होणे येथे शक्य नाही, असे सांगितले होते. तरीही, सुनील हिलम यांनी आमच्याकडे लेखी लिहून दिले की, काही झाल्यास त्याची जबाबदारी माझी असेल. त्यानंतर, आमच्या डॉक्टरांनी प्रयत्न करूनदेखील प्रसूती अशक्य वाटल्याने त्यांना पुढे पाठविण्यात आले.
- डॉ. सुधाकर शिंदे, अधीक्षक, शहापूर उपजिल्हा रु ग्णालय