परिचारिका असल्याचे सांगून अर्भक पळविण्याचा प्रयत्न
By admin | Published: December 17, 2014 10:34 PM2014-12-17T22:34:01+5:302014-12-17T23:12:26+5:30
वॉर्डबॉयची सतर्कता : दोडामार्ग येथील घटनेने खळबळ
दोडामार्ग : म्हापसा येथील आरोग्य विभागातून परिचारिका म्हणून आले आहे, असा बहाणा करीत एका महिलेने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील नवजात अर्भक वजन मोजणीसाठी नेत असल्याचे सांगून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील वॉर्डबॉय नीलेश बांदिवडेकर याच्या सतर्कतेमुळे या महिलेला पकडण्यात रुग्णालय कर्मचाऱ्यांना यश आले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
तीन दिवसांपूर्वी मूळच्या कर्नाटक येथील व सध्या अतने-गोवा येथे राहत असलेल्या लल्ता व्यंकटेश कटीमणी यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यांना बाह्यरुग्ण विभागात ठेवण्यात आले होते.
बुधवारी सायंकाळी ही महिला परिचारिका वेशात रुग्णालयात आली. त्यावेळी बाहेर असलेला वॉर्डबॉय नीलेश बांदिवडेकर याला ‘मी म्हापसा रुग्णालयातून आले आहे’ असे सांगून ती महिला बाह्यरुग्ण विभागात घुसली.
तेथील लल्ता कटीमणी यांच्याकडे जाऊन ‘मी म्हापसा येथील रुग्णालयातून आले असून, नवजात बालकांचे वयोमान तपासते,’ असे सांगून त्यांच्या अर्भकास घेऊन ती बाहेर आली. त्याचवेळी बांदिवडेकर यांना त्या महिलेविषयी संशय
आल्याने त्यांनी महिलेबाबत बालकाच्या नातेवाईकांकडे खात्री केली असता, त्या आमच्या कुणीही नातेवाईक नसल्याचे त्यांनी
सांगितले. त्यामुळे बांदिवडेकर यांनी त्या महिलेला अडविले व तिच्याकडून नवजात बालक काढून घेतले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. उशिरापर्यंत पोलीस त्या महिलेची कसून चौकशी करीत होते. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेमुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
महिलेकडून विसंगत माहिती
दोडामार्ग येथे पकडण्यात आलेल्या संशयित महिलेच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला असून, उशिरापर्यंत तिने आपले नाव पोलिसांना सांगितले नव्हते. तपासात पहिल्यांदा आपण म्हापसा येथील असल्याचे तिने सांगितले, परंतु ती विसंगत माहिती देत असल्याने तिच्याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ शकली
नाही.