राज्यात कोरोना पाठोपाठ टोमॅटो पिकावरही परदेशी विषाणुजन्य रोगाचे संक्रमण; शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:10 PM2020-05-14T19:10:28+5:302020-05-14T19:14:22+5:30
मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रोगाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सतीश सांगळे
कळस : राज्यात कोरोना संसर्ग फैलावामुळे शेती अडचणीत आली असतानाच टोमॅटो पिकावर परदेशी विषाणूजन्य रोगाचे संक्रमण झाल्याने पीकच नेस्तनाबूत होण्याची भीती व्यक्त होत आहे .मात्र , सदर रोगाचे निदान व उपाययोजना करण्यास विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .
राज्यात पुणे सोलापूर, सातारा,नाशिक, नगर या भागात सुमारे चार हजार हेक्टरवर टोमॅटोचे पीक घेतले जाते. राज्यात टोमॅटो हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कमी कालावधीचे हे पीक घेतले जाते .मात्र, विषाणूजन्य रोगामुळे अडचणीत आले आहे. टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवुन त्याचा रंग बदलुन हे फळ सडत आहे. झाडावर रोग दिसत नाही. मात्र फळ वाकडे तिकडे होत आहे. हा रोग पहिल्यांदाच आला आहे.
टोमॅटोवरती स्पॉटेड विल्टव्हायरस, तिरंगा, बोकडय़ा, पिवळा लिफकर्ल, मोझँक हे विषाणुजन्य रोग येतात. मात्र हा विषाणू वेगळ्या स्वरुपाचा आहे. लाल व रसरशीत असलेल्या टोमॅटोला विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे फळे सडत आहेत त्यावर रासायनिक औषधांची फवारणी करुनही फायदा होत नाही.मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रोगाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या रोगाने थैमान घातल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या रोगावर कोणताही उपाय चालत नसल्याने शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तालुक्यातील शेळगाव, कडबनवाडी, लासुर्णे, निमगाव केतकी, रामकुंड अंथुर्णे ,भरणेवाडी, बोरी, काझड,शिंदेवाडी,परिसरात टोमॅटोचे पीक घेण्यात येते. टोमॅटोच्या रोपापासून, ते मल्चिंग पेपरवरील लागवड, झाडांना आधार देण्यासाठी तार-काठी, लागवडीची मजुरी यावर शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांच्या वर खर्च केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .या रोगावर कोणत्याही प्रकारच्या फवारणीचा उपयोग होत नाही. ढगाळ वातावरणामुळे रोग वाढत आहे .त्यामध्ये लाँकडाऊन कालावधीत हा प्रसार झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे .
टोमॅटो पिकाची लागवड तीन हंगामात केली जाते .खरीप हंगामासाठी जून, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर या महिन्यात लागवड होते, मात्र तालुक्यात मार्च महिन्यात टोमॅटो लागवडीवर अधिक भर दिला जातो. या टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा मानस आहे. मात्र, आता लागवड केलेल्या टोमॅटोला चांगले दर मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र , ती फोल ठरली आहे.
.............................
शेळगाव, कडबनवाडी या परिसरात टोमॅटोचे सुमारे १० प्लाँट आहेत. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळाचा आकार, रंग बदलून फड वाया गेला आहे .माझे दोन एकर क्षेत्रातील पिक वाया गेले आहे. दोन लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे .मात्र , विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. कृषी विभागाने पाहणी करून उपाययोजना करण्याची गरज आहे .
सुनिल शिंगाडे, उत्पादक, शेतकरी
------------------------------------
तालुक्यात साधारणपणे २०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिक असते आहे .यामध्येच टोमॅटो पिक येते. मात्र , उन्हाळ्यात क्षेत्र कमी असते. टोमॅटो पिकांचा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झालेल्या टॉमेटो पिकाच्या क्षेत्राची माहिती कृषी सहाय्यकांकडुन मागवली आहे. मात्र, या विषाणुचे निदान कृषी शास्त्रज्ञ करीत आहेत .
- सुर्यभान जाधव, तालुका कृषी अधिकारी इंदापुर.