एसआरएच्या इमारतींमध्ये घुसखोरी

By Admin | Published: September 6, 2015 01:40 AM2015-09-06T01:40:56+5:302015-09-06T01:40:56+5:30

सांताक्रुझ पश्चिमेकडील दौलतनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोन पुनर्वसन इमारतींमध्ये रहिवाशांनी अनधिकृतपणे घुसखोरी केली आहे. त्यामुळे घुसखोरी

Infiltration in SRA buildings | एसआरएच्या इमारतींमध्ये घुसखोरी

एसआरएच्या इमारतींमध्ये घुसखोरी

googlenewsNext

- रहिवाशांना नोटीस

मुंबई : सांताक्रुझ पश्चिमेकडील दौलतनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोन पुनर्वसन इमारतींमध्ये रहिवाशांनी अनधिकृतपणे घुसखोरी केली आहे. त्यामुळे घुसखोरी केलेल्यांनी तातडीने सदनिका रिकामी करावी, अशी नोटीस एसआरएने रहिवाशांना पाठविली आहे. या नोटिशीनंतरही रहिवाशांनी घराचा ताबा न सोडल्यास एसआरए कायद्यानुसार इतर कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अपात्र ठरविण्याचा
इशाराही एसआरएने रहिवाशांना दिला आहे.
दौलतनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन इमारत क्रमांक डी-१ आणि डी-२मधील घरांमध्ये या योजनेतील रहिवाशांनी अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे एसआरएने जाहीर केले आहे. रहिवाशांनी घरांचा ताबा घेतल्याने त्यांच्यावर सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तरीही रहिवासी घराचा ताबा सोडत नसल्याने एसआरएने रहिवाशांना घर खाली करण्याची नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये रहिवाशांनी अनधिकृतपणे घर ताब्यात घेतल्याने त्यांनी घराचा ताबा सोडावा, तसेच त्यानंतर नियमानुसार सोडत पद्धतीने सदनिकेचा ताबा आपणास देण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
एसआरएने पाठविलेल्या नोटिशीनुसार, रहिवाशांनी ४८ तासांच्या आत घराचा ताबा न सोडल्यास त्यांच्याविरुद्ध सक्तीची कारवाई करण्यात येणार असून, घुसखोर हे या योजनेतील पात्र झोपडीधारक असल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायद्यानुसार त्यांना कायमचे अपात्र घोषित करण्यात येईल, असा इशाराही एसआरएने दिला आहे.

Web Title: Infiltration in SRA buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.