महागाईने रोखली व्याजदर कपात!
By Admin | Published: June 8, 2016 03:57 AM2016-06-08T03:57:30+5:302016-06-08T03:57:30+5:30
उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे
मुंबई : उद्योग वर्तुळाने वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहे. महागाई पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून वाढत्या महागाईनेच व्याजदर कपातीला ‘खो’ घातल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सादर केलेल्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणातून दिसून आले आहे.
चालू आर्थिक वर्षाचे दुसरे द्वैमासिक पतधोरण मांडताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी कोणत्याही दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे रेपो, सीआरआर, एसएलआर या सारखे सर्व दर कायम राहिले आहेत. मात्र, एप्रिलपासून भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा महागाईच्या झळांनी ग्रासायला सुरुवात केली असल्याचे सांगत, आगामी काळात अन्नधान्य आणि किरकोळ बाजारातील महागाई डोके वर काढेल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भाववाढीचा इशाराच दिला आहे. तूर्तास शेतकऱ्यांइतकेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे लक्षही मान्सूच्या आगमनाकडे लागले असून पावसाच्या कामगिरीवर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
एवढेच नव्हे, तर मान्सून उत्तम झाला तर त्याचा निश्चित फरक हा महागाई आटोक्यात आणण्यासाठी पडेल, असेही ते म्हणाले. आगामी काळातील दर कपातीसाठी मान्सून हा मुद्दा कळीचा ठरणार आहेच पण याचसोबत १४ आणि १५ जून रोजी अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीकडेही इतर जगासोबत भारताचेही लक्ष लागलेले आहे. या बैठकीत अमेरिकेत व्याजदरात वाढ होते का, याचाही अनेक देशांच्या अर्थकारणावर प्रभाव पडणार आहे. (प्रतिनिधी)
>आॅगस्ट महिन्यामध्ये दरकपातीची शक्यता
चालू आर्थिक वर्षातील तिसरे द्वैमासिक धोरण ९ आॅगस्ट २०१६ रोजी मांडले जाईल. आॅगस्ट महिन्यापर्यंत साधारण मान्सूनच्या स्थितीचा अंदाज आलेला असेल.
परिणामी, सध्या व्याजदर कपातीसाठी असलेला वाव आणि आॅगस्टपर्यंत बरसणारा मान्सून यामुळे ९ आॅगस्ट रोजी मांडण्यात येणाऱ्या पतधोरणाद्वारे दरकपात होईल, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
>अर्थव्यवस्थेचा विकास ७.६% दराने
आंतरराष्ट्रीय अर्थकारणात जरी अस्थिरता असली तरी देशांतर्गत पातळीवर सुधार दिसत येत असून भारतीय कंपन्यांची कामगिरीही सुधारत आहे. किंबहुना, मंदीच्या प्रदीर्घ फेऱ्यानंतर गेल्या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांना पुन्हा एकदा नफ्याची झुळूक अनुभवायला मिळाली आहे. मान्सूनवर देशाची आगामी दिशा निश्चितच अवलंबून आहे. पण अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा सर्वंकष विचार करचा चालू आर्थिक वर्षात विकास दर
7.6%
असेल, असे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे.
विकासदराचे लक्ष्य गाठणे आणि महागाई आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना प्राधान्य देणे, या सरकारी भूमिकेशी सुसंगत असेच पतधोरण रिझर्व्ह बँकेने मांडले आहे.
- शक्तीकांता दास, वित्तीय व्यवहार सचिव
दुसऱ्या टर्मबद्दल
राजन म्हणतात...
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत सप्टेंबर २०१६ मध्ये संपत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. याबाबत राजन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, या मुद्यावर मला भाष्य करून मीडियाच्या सध्या सुरू असलेल्या रंजनात खोडा घालायचा नाही. असे निर्णय हे केंद्र सरकार आणि संबंधित व्यक्ती यांच्यातील चर्चेअंती होतात.
>कच्च्या तेलाच्या किमतीत घट
गेल्या १४ महिन्यांत प्रथमच एक महिन्याच्या फरकात महागाईच्या निर्देशांकात इतकी वाढ नोंदली गेली आहे. याचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडीत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पावणेदोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट झाली होती. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून पुन्हा तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. याचा परिणाम देशात महागाईने पुन्हा डोके वर काढण्याच्या रूपाने दिसून येत आहे. त्यामुळे तूर्तास महागाई आटोक्यास रिझर्व्ह बँकेने प्राधान्य दिले आहे.
>आतापर्यंत पावणे दोन टक्के व्याजदर कपात
तारीख दर कपात
१५ जाने.२०१५पाव टक्का
३ फेब्रु. २०१५बदल नाही
७ एप्रिल २०१५पाव टक्का
२ जून २०१५पाव टक्का
४ आॅगस्ट २०१५बदल नाही
तारीख दर कपात
२९ सप्टेंबर २०१५अर्धा टक्का
१ डिसेंबर २०१५ बदल नाही
२ फेब्रु. २०१६बदल नाही
५ एप्रिल २०१६अर्धा टक्का
६ जून २०१६बदल नाही