महागाईने फळांचा गोडवा घटला
By admin | Published: August 8, 2015 01:21 AM2015-08-08T01:21:37+5:302015-08-08T01:21:37+5:30
सध्या कोकिळा व्रतासह इतरही धार्मिक उपवासाचे दिवस सुरू असून फळांना चांगली मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळत आहे़ परदेशातून येणारे सफरचंद व द्राक्षे
राम जाधव, जळगाव
सध्या कोकिळा व्रतासह इतरही धार्मिक उपवासाचे दिवस सुरू असून फळांना चांगली मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळत आहे़ परदेशातून येणारे सफरचंद व द्राक्षे तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत़
या वर्षीच्या पाऊसमानाचा फळउत्पादनालाही फटका बसला आहे़ तसेच १८ वर्षांनंतर या वर्षी आलेल्या कोकिळाव्रताच्या उपवासासाठी महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर फळांची मागणी आहे़ त्यामुळे सध्या बाजारपेठेत सर्वच फळांचे भाव वाढलेले आहेत़ जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातून डाळिंब, पपई व मोसंबीची आवक होत आहे़ पपईची आवक घटल्याने भाव वाढले.
द्राक्षे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
परदेशातून येणाऱ्या वॉशिंग्टनच्या द्राक्षांना ३२० रुपये प्रती किलो भाव मिळत आहे़ लालसर व मध्ये बी असलेले हे द्राक्ष चवीलाही गोड असल्याने चांगलाच भाव खात आहेत़ त्यामुळे सध्यातरी हे द्राक्ष सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत़ स्थानिक द्राक्षे बाजारपेठेत यायला अजून अवधी असून साधारण डिसेंबर महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे़
डाळिंबांची आवक चांगली ....
मागील वर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे डाळिंबाचा हंगाम लांबणीवर पडत गेला़ त्यामुळे बहुतेक ठिकाणचा माल आता तयार झाल्याने बाजारपेठेतील आवक एकदमच वाढली आहे़ परिणामी डाळिंबाचे भाव मर्यादित असल्याने ग्राहकांसाठी तेवढाच एक दिलासा आहे़ सध्या डाळिंबाला किरकोळ बाजारात ६० ते १२० रुपये असा प्रतीनुसार भाव मिळत आहे़