पाच वर्षांत महागाई तिप्पट; खर्चमर्यादा तीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 05:30 AM2016-10-18T05:30:09+5:302016-10-18T05:30:09+5:30
गेल्या पाच वर्षांत निवडणूक प्रचारातील प्रत्येक बाबीच्या किमती तिप्पट झाल्या पण निवडणूक खर्चाची मर्यादा मात्र तीच राहणार आहे.
मुंबई : गेल्या पाच वर्षांत निवडणूक प्रचारातील प्रत्येक बाबीच्या किमती तिप्पट झाल्या पण निवडणूक खर्चाची मर्यादा मात्र तीच राहणार आहे. अ वर्ग नगरपालिकांच्या क्षेत्रात नगरसेवकाच्या उमेदवारासाठी तीन लाख रुपये, ब वर्ग नगरपालिकेत दोन लाख रुपये तर क वर्ग नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये दीड लाख रुपये खर्चमर्यादा असेल.
‘इतक्या कमी खर्चात उमेदवार निवडणूक कशी लढवतील?’ या प्रश्नात राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मर्यादा घालून दिली आहे.
पाच वर्षांपूर्वीच्या नगरपालिका निवडणुकीत खर्चाची हीच मर्यादा होती. या पार्श्वभूमीवर, अमाप खर्च करणारे उमेदवार विविध पळवाटा नेहमीप्रमाणे शोधतील. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. लवकरच त्या बाबतची घोषणा केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
>आचारसंहितेचा ‘वॉच’
निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर राज्य निवडणूक आयोगाची बारीक नजर असेल. प्रत्येक नगरपालिकेत अतिरिक्त जिल्हाधिकारी वा
तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यास निरिक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे. हे निरिक्षक किमान सहा दिवस त्या नगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास राहतील.
उमेदवारांच्या प्रचाराचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरारी पथके सक्रिय असतील. तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येतील. तिथे निवडणूक गैरप्रकारांबद्दल तक्रारी करता येतील.