महागाई, बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे; शिवसेना मंत्री दादा भुसेंचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 09:49 AM2022-05-02T09:49:31+5:302022-05-02T09:49:47+5:30
आज कोणीही बोलत असलं तरी शिवसेना कोणीही संपवू शकत नाही असं मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजे, ४ मे रोजी जर भोंगे उतरले नसतील तर मशिदीबाहेर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा दुप्पट लाऊडस्पीकरवर लावू असा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर सत्ताधारी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा मनसे घेत असल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
दादा भुसे म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. स्थानिक प्रशासन याबाबत चौकशी करून परवानगी देईल. मात्र, वैयक्तिक विचाराल तर इतरही अनेक महत्वाचे प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आता महत्वाचे आहे.आज कोणीही बोलत असलं तरी शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. ५०-६० वर्ष रक्ताचं पाणी करून बाळासाहेबांनी शिवसेना उभी केलीय. आज ते जरी मोठे नेते असले तरी बाळासाहेबांचाच आशीर्वाद आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मंदिर मशिदीचा मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याचं पालन करावे लागेल. मालेगावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. काही गावांचा इतिहास आहे पण मालेगावने चांगलं वागून नाव लौकिक केलय. पण काही लोकांनी ठरवलंच आहे तर त्याला काही करू शकत नाही असं सांगत दादा भुसे यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंचाही राज ठाकरेंना टोला
आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी कसे फसवले हे माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मी नाही म्हटले तरी थोडासा धुर्तपणे भाजपसोबत वागतो, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं तसेच भोंग्याचा मुद्दा गाजलाय असे मला वाटत नाही. कारण, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे, तो निर्णय देशभर लागू आहे. गतआठवड्यात गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात एक बैठकही घेतली. त्यामध्ये असेच ठरले की, जसे नोटबंदी केली, लॉकडाऊन केले, हा निर्णय देशभर लागू केला होता. त्याचप्रमाणे भोंगाबंदीही देशभर करा असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भोंग्याचा चेंडू केंद्राकडे ढकलला. त्याचसोबत अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणकोणते खेळ करताता हे लोकांनी अनुभवलं आहे.कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ तर असे खेळाडू असतात ना असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सारे काही बंद होते. आता कुठे जनजीवन रुळावर येत आहे, अशा परिस्थितीत फुकटात करमणूक पाहायची असेल तर ती का नाही पाहायची असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला.