आभासी विश्वात बालकांचा वावर
By Admin | Published: December 6, 2015 02:17 AM2015-12-06T02:17:12+5:302015-12-06T02:17:12+5:30
‘अवघ्या दोन वर्षांचा आमचा बंटी मोबाइलमध्ये विविध गेम खेळण्यात परफेक्ट झाला आहे,’ असे अभिमानाने सांगणारे त्याचे पालक आता मात्र त्याच्या वर्तनामुळे चिंतातुर झाले आहेत.
- प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
‘अवघ्या दोन वर्षांचा आमचा बंटी मोबाइलमध्ये विविध गेम खेळण्यात परफेक्ट झाला आहे,’ असे अभिमानाने सांगणारे त्याचे पालक आता मात्र त्याच्या वर्तनामुळे चिंतातुर झाले आहेत. कारण, त्याच्यासमोरून मोबाइल, टीव्ही थोड्या वेळासाठी जरी दूर केले तरी तो अस्वस्थ होतो. चिडचिड करीत अनेकदा आक्रमक होतो. त्याच्या हाती खेळणीऐवजी मोबाइल दिल्याने तो आभासी विश्वात हरवल्याची खंत आता त्याच्या पालकांना वाटत आहे.
समाजात आज असे अनेक बंटी आहेत. त्यांच्या पालकांना आपल्या बालकातील बदल खटकू लागले आहेत. त्यापैकी काही पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे येत आहेत, तर अनेक पालक अजूनही त्यांच्या मुलांना आभासी विश्वात वावरूदेत आहेत. आपल्याला लहानपणी जे मिळाले नाही ते सर्व आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न पालक करीत असतात. मग बालवयातच त्यांच्या हाती, मोबाइल, लॅपटॉप दिला जातो आणि मुले त्यांचे गुलाम बनतात.
काही मुले मैदानी खेळच विसरून जातात. मित्रांबरोबरच मोकळ्या मैदानात खेळण्याच्या वयात मुले एकलकोंडी होतात. मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी अनेक लहान मुले येण्याचे प्रमाण वाढले आहे.
मागील तीन महिन्यांत २ ते १० वर्षे वयोगटातील १८० केसेस माझ्याकडे आल्या आहेत. त्यात ११२ मुले व ६८ मुलींचा समावेश आहे. त्यातील अनेक जण दिवसातील ५ ते ७ तास टीव्ही बघत असल्याचे आढळून आले. २ ते ३ तासांपेक्षा अधिक वेळ ते मोबाइलवर गेम खेळत असतात.
काहींना तर खेळण्यासाठी स्वतंत्र मोबाइल घेऊन दिल्याची धक्कादायक माहिती पालकांच्या संवादातून समोर आली. ही मुले वास्तव जगापासून दूर जात आहेत, यासाठी सर्वप्रथम पालकांनाच समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पालकांनी आपल्या बालकाच्या वर्तन समस्येकडे कानाडोळा केला तर भविष्यात त्यांना व बालकाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
मुले मोबाइलच्या आहारी
पाच वर्षांचा एक मुलगा के.जी.मध्ये शिकत आहे. मात्र, तो अनेकदा शाळेत येत नाही. त्याचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. घरी आजी असते. तो रडू नये, बाहेर खेळण्यास जाऊ नये म्हणून त्यास खास मोबाइल विकत घेऊन दिला आहे. तो तासन्तास मोबाइलवर गेम खेळत असतो. अभ्यासाचा कंटाळा करणे, शाळेत वही-पुस्तक अन्य वस्तू हरवणे, मुलांना मारणे, मित्रांमध्ये न खेळणे, सतत स्वमग्न असणे अशी लक्षणे त्याच्यात दिसून आली. शिक्षकांच्या सांगण्यावरून त्याच्या पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे त्याला आणले, असे डॉ. शिसोदे यांनी सांगितले.
पालकांनी काय करावे?
आई-वडिलांनी मुलांना वेळ द्यावा. घरी आल्यावर पालकांनी स्वत: टीव्हीसमोर जास्त वेळ बसू नये. मोबाइल दूर ठेवावा.
शारीरिक व बौद्धिक चालना देणारी खेळणी मुलांना द्यावी. स्वत: त्याच्याबरोबर खेळावे.
ठरवून टप्प्याटप्प्याने बालकांचे टीव्ही बघण्याचे, मोबाइलशी खेळण्याची सवय कमी करावी. मुलांना इतर मित्रांसोबत खेळू द्यावे.
बालकामध्ये वर्तन समस्या आढळून आल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशी सूचना बाल मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. संदीप सराफ यांनी केली.
आजाराची लक्षणे
मुलगा एका ठिकाणी एक मिनिटही न बसणे, सतत अस्वस्थ-गोंधळलेला असणे.
सहनशक्ती कमी होणे, निरर्थक हालचाली करणे, कोणाचेही न ऐकणे, अतिचंचलता, स्वमग्नता, चिडचिड वाढणे
अनेकदा आक्रमक होऊन वस्तूंची आदळआपट करणे आदी लक्षणे मुलांमध्ये दिसून येतात.