उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विद्यापीठांच्या दौऱ्यावर, फेसबुक लाइव्हद्वारे दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:39 AM2020-09-14T02:39:12+5:302020-09-14T02:39:35+5:30
सोमवारी ते गडचिरोली, नागपूर, अमरावती विद्यापीठांचा दौरा करतील. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक मानसिकता तयार करणे आणि सोप्या पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : अंतिम वर्ष परीक्षांची राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची तयारी सुरू असताना प्रत्येक विद्यापीठाची काय तयारी आहे? समस्या काय आहेत याचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत सोमवारपासून राज्यातील विद्यापीठांचे दौरे करणार असल्याची माहिती त्यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे दिली.
सोमवारी ते गडचिरोली, नागपूर, अमरावती विद्यापीठांचा दौरा करतील. यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा देणा-या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक मानसिकता तयार करणे आणि सोप्या पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मार्गदर्शक सूचना जारी करून, विद्यापीठांच्या अकॅडमिक कौन्सिलच्या निर्णयानुसार योग्य त्या पद्धतीने आॅनलाइन / आॅफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठांना देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील ७ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण परीक्षा देताना येणार नाही याची काळजी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घ्यायची असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद अशा बहुतांश विद्यापीठांकडून परीक्षा आॅनलाइन एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एसएनडीटी विद्यापीठाचे ९०% प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून २५ एमसीक्यूच्या परीक्षांची तयारी असल्याची माहितीही त्यांनी दिली. या सर्व परीक्षांआधी विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट घेतल्या जाणार असून लवकरच त्यांना प्रश्नपेढ्या पुरविल्या जातील असेही त्यांनी सांगितले. असाइनमेंट पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्यायही अनेक विद्यार्र्थ्यांनी मागितला. मात्र प्रश्नपत्रिका छापणे, त्या वितरित करणे, त्यांचे संकलन, मूल्यमापन या सर्व प्रक्रियेत कोरोना संसर्गाचा धोका असल्याने अनेक विद्यापीठांनी आॅनलाइन एमसीक्यू पद्धतीचा पर्याय निवडल्याची माहिती त्यांनी दिली.