डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीला कायदेशीर आधार नाही
By admin | Published: February 12, 2016 01:55 AM2016-02-12T01:55:01+5:302016-02-12T01:55:01+5:30
मुंबई हल्ल्याच्या (२६/११) आधी मुंबईवर हल्ल्याचे दोन फसलेले प्रयत्न आणि लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आत्मघाती हल्लेखोर इशरत जहाँबाबत डेव्हिड हेडली याने जी माहिती दिली तिला कायदेशीर
- डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबई हल्ल्याच्या (२६/११) आधी मुंबईवर हल्ल्याचे दोन फसलेले प्रयत्न आणि लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) आत्मघाती हल्लेखोर इशरत जहाँबाबत डेव्हिड हेडली याने जी माहिती दिली तिला कायदेशीर आधार नाही, असे मुंबई पोलिसांतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हेडलीने जे काही सांगितले त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही मोल नाही; व त्याने जे काही दावे केले आहेत त्याला दुजोरा देणारे काहीही नाही, असे हे अधिकारी म्हणाले.
अधिकारी म्हणाले की, मुंबईवर २००८मध्ये दहशतवादी हल्ला होईल असा अगदी क्षीण म्हणता येईल असा अंदाज गुप्तचर विभागाने (आयबी) व्यक्त केला होता. परंतु वस्तुस्थिती अशी होती की इशरत जहाँ ही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती ही बाब चांगली माहीत होती. पण वादाचा मुद्दा ठरला तो तिला अतिशय थंड डोक्याने चकमकीत मारण्यात आल्याचा. इशरत जहाँचे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे हेडलीने जे काही सांगितले त्याचा आमच्या प्रकरणावर काय परिणाम होईल याबद्दल केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) काहीही भाष्य करण्यास तयार नाही.
डेव्हिड कोलमन हेडलीने गुरुवारी दिलेल्या साक्षीमध्ये इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आत्मघाती हल्लेखोर होती आणि भारतात जी कारवाई फसली तिच्याशी तिचा संबंध होता, असे मी ऐकले आहे, असे सांगितले होते. हे विधान ऐकीव वा अफवेच्या स्वरूपातील असून, न्यायालय त्यावर विश्वास ठेवत नाही. हेडली हा इशरत जहाँ प्रकरणात साक्षीदार आहे का? तो कथानक सांगत असून, चकमकीच्या प्रकरणावर त्याच्या विधानाचा काहीही परिणाम होणार नाही. तो प्रकरणाला खळबळजनक बनवू पाहत आहे. उद्या हेडली म्हणेल, १९९३चा स्फोट दाऊद इब्राहिमनने घडवून आणला होता. या साक्षीमुळे नेमका काय परिणाम होणार आहे, असे माजी आयपीएस अधिकारी आणि आता वकील बनलेले वाय. पी. सिंह यांनी म्हटले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंह म्हणाले की, इशरत जहाँ ही दहशतवादी गटाचा भाग होती याबद्दल पोलीस वर्तुळाला कधीही शंका नव्हती. तिचे मत प्रचंड प्रयत्नांनंतर बदलण्यात आले होते (ब्रेनवॉशड्) व तिचे पालक किंवा तिचे नातेवाईक यांचे काहीही मत असले तरी ती लष्कर-ए-तोयबासाठी काम करीत होती. चकमक ज्या पद्धतीने (थंड डोक्याने विचार करून) घडली त्या पद्धतीबद्दल वाद होता. इशरत स्त्री असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना फार मोठी सहानुभूती मिळाली; परंतु पोलीस अधिकाऱ्यांना तिचा दहशतवादी इतिहास पुरेसा ठावुक होता, असे एम. एन. सिंह म्हणाले. २६/११च्या हल्ल्यापूर्वी मुंबईवर दोन वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न फसला, असे हेडलीने साक्षीत सांगितले. त्याची गुप्तचरांना माहिती मिळविण्यात अपयश आले का, असे विचारले असता सिंह म्हणाले की, ‘‘गुप्तचरांना तसे काही अपयश आलेले नव्हते कारण ताज आणि ओबेरॉय हॉटेल, सिद्धिविनायक मंदिराला दहशतवादी लक्ष्य करू शकतात अशी निश्चित माहिती होती म्हणून तेथे सुरक्षा वाढविण्यात आली. त्यामुळे गुप्तचरांना अपयश आले, असे म्हणता येणार नाही. परंतु दोन महिने हल्ले न झाल्यामुळे हॉटेलचे व्यवस्थापन आणि अधिकारी शिथिल झाले. सुरक्षा व्यवस्थेमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापनाने म्हटले होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली, असे म्हणण्याऐवजी मी अचूक गुप्त माहिती काढता आली नाही, असे म्हणेन.’’
इशरत जहाँ चकमक प्रकरणावर हेडलीने सांगितलेल्या गोष्टींचा काय परिणाम होईल, असे विचारले असता सीबीआयचा प्रवक्ता म्हणाला की, ‘चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. इशरत जहाँ प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे हेडलीने केलेल्या दाव्यांबद्दल आम्ही काहीही मत व्यक्त करणार नाही.’’
एम. एन. सिंह म्हणाले... मुंबईवरील हल्ल्याचे दोन प्रयत्न फसले या हेडलीच्या दाव्याची खातरजमा करता येऊ शकत नाही. हे अपयश कुठे घडले हे कोणाला माहिती आहे व ही माहिती २६/११च्या हल्ल्यानंतर सात वर्षांनी समोर येत आहे, असे सिंह यांनी सांगितले. वाय. पी. सिंह यांनी हेडलीची साक्ष चुकीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले.
वाय. पी. सिंह म्हणाले... की भारतात त्याचा कोणाशी संपर्क होता हे का विचारले जात नाही. आम्ही त्याला पाकबद्दलच विचारत आहोत व त्या माहितीला आम्ही काहीही आधार देऊ शकत नाही. ताडदेव येथे दुकान सुरू करायला तुला कोणी मदत केली हे त्याला आम्ही विचारले पाहिजे. एक अमेरिकन नागरिक अनेक लोकांना भेटतो ते का? असा संशय यंत्रणांना का आला नाही. त्याने जे काही सांगितले त्याला कायद्याच्या दृष्टीने काहीही किंमत नाही, असेही वाय. पी. सिंह म्हणाले.