वृक्षांच्या कत्तलींची माहिती आता वेबसाईटवर
By Admin | Published: March 31, 2017 01:48 AM2017-03-31T01:48:35+5:302017-03-31T01:48:35+5:30
मुंबई एमएमआर क्षेत्रातील महत्त्वाच्या पाच महापालिकांकडून त्यांच्या क्षेत्रात किती वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली,
मुंबई : मुंबई एमएमआर क्षेत्रातील महत्त्वाच्या पाच महापालिकांकडून त्यांच्या क्षेत्रात किती वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली, किती वृक्ष कापण्यात आले आणि किती वृक्षांची लागवड झाली याची माहिती जिओ टॅगिंगसह आपल्या वेबसाइटवर अपलोड करावी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली.
भांडुपमध्ये पिरामल रिअॅल्टी या विकसकाकडून अशोक, पिंपळ, जंगली चेरी, आंबा, खजूर, नारळ, कडूलिंब आदी वृक्षांची तोड करण्यात आली. त्यावरील हरकतींना बगल देऊन विकासकाला वाचविले जात असल्याबद्दल अशोक पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. रस्त्याच्या बांधकामाआड येणारे झाड तोडायचे तर आम्हाला वर्षवर्ष परवानगी मिळत नाही; पण बिल्डरांना ती पटापट दिली जाते. यात काही गैरव्यवहार होतात, असा आरोप त्यांनी केला. या विकासकावर कारवाईची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी चौकशीअंती कारवाईचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
ठाणे शहरातही अशाच प्रकारे हजारो पुरातन वृक्षांची कत्तल करण्यात आली. हे विकासक आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीतून हे घडत असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी केला.
मेट्रोसाठी झाडे कापण्यावरून आगडोंब उसळतो आहे. पर्यायी वृक्षलागवड त्यात केली जाणार आहे पण अशी कोणतीही पर्यायी लागवड न करता विकासकांना परवानग्या कशा काय दिल्या जातात, असा प्रश्न भाजपाचे आशिष शेलार यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
२०१०पासून तोडले २५ हजार वृक्ष
मुंबईत २०१० ते २०१६ दरम्यान तब्बल २५ हजार वृक्ष तोडण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरणाने दिल्याची माहिती आज सभागृहात देण्यात आली.