… तेव्हापासून भिडेंकडून दिवसाला दोन-तीन फोन येत होते, सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 02:49 PM2022-11-08T14:49:35+5:302022-11-08T14:50:35+5:30
सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून यावर स्पष्टीकरण देत मोठा दावा करण्यात आला आहे.
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्या त्यांच्या पायाही पडल्या होत्या. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. परंतु हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याविषयी आयोजकांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते, असा दावा यात करण्यात आलाय.
मेहता पब्लिकेशन हाऊसच्या एडिटोरिअल हेड आणि संवाद लेखकाशी कार्यक्रमाच्या निवेदक योजना यादव यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हटलेय पोस्टमध्ये?
“ही हद्द झाली. अशक्य हद्द. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. तेव्हापासून दिवसाला भिडेंकडून दोन तीन फोन येत होते. सुधाताईंनी आधीच कुणाला भेटणार नसल्याचं सांगितलं होतं. पण हे महाशय हट्टाला पेटले होते. आम्ही ऑफिसवर फोन येत होते तेव्हाच नाही म्हणून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांचं हॉटेल शोधलं. सुधा मूर्ती यायच्या आधीच हे तिथं पोहोचले. परत गेले. सुधा मूर्ती दुपारी हॉटेलवर आल्या आणि रूमवर विश्रांतीला गेल्या. संध्याकाळी ५ ला कार्यक्रम होता. हे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये ठाण मांडून बसले. शेवटी सुधाताईना मी मागच्या दरवाज्याने बाहेर काढलं. त्या गाडीत बसताना भिडेंचे कार्यकर्ते पळत आले, तर तिथून आम्हाला अक्षरशः गाडी दामटायला लागली. गाडीत त्या मला म्हणाल्या, कोण आहे ही व्यक्ती? त्यांना मी परिचय सांगितला. तर त्या थोड्या त्रासल्याच होत्या. म्हणाल्या, यांना मला भेटून काय करायचं आहे? ते त्यावेळी आम्हालाही माहीत नव्हतं.”
“आम्ही हॉलवर पोहोचलो. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. आमचा नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत सुरू होता. तिकडे भिडेंचे कार्यकर्ते हॉल बाहेर जमा व्हायला लागले. तस पोलिसांना टेन्शन येऊ लागलं. पोलिसांना फक्त काही अघटित घडू नये म्हणून काळजी घ्यायची होती. म्हणून ते आमच्या मागे लागले की तुम्ही दोन मिनिट भिडेंना त्यांना भेटू द्या. कार्यक्रमाच्या मध्यात वाचकांना सोडून सुधा ताईंना उठायचं नव्हतं. तरी त्या नाईलाजाने उठल्या आणि वैतागून भेटायला गेल्या. त्याआधी त्यांनी मला त्यांचं वय विचारलं फक्त. फार वयस्कर असतील तर त्या नमस्कार करतात म्हणून. त्यांना पाहिल्यावर ते त्यांना फार म्हातारे वाटले म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला. सुधाताईंनी मला हॉटेलवर परत जाते वेळी सांगितलं की भिडे त्यांना म्हणत होते की त्यांना दीड तास बोलायचं आहे. सुधाताई म्हणाल्या माझ्याकडे दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. नंतर आमची सुधाताईंचा फोटो वापरून कसा प्रोपौगंडा होईल यावरही बोललो. सुधाताई म्हणत होत्या, ' योजना, अग अशा लोकांशी आपण काय बोलणार. त्यांना भेटायचं असेल आणि आपल्याला शक्य असेल तर भेटून घ्यायचं आणि सोडून द्यायचं' आणि ANI सारख्या मीडियाने ही अशी बातमी देणं म्हणजे सगळ्यात दुर्दैव आहे.”
— Sudha_murthy (@sudhamurty) November 8, 2022
दरम्यान, सुधा मूर्ती यांनीदेखील आपल्या ट्विटरच्या माध्यमातून संभाजी भिडे यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.