पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द होणार, शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:44 AM2018-03-11T04:44:59+5:302018-03-11T04:44:59+5:30
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली.
मुंबई - गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तत्त्वत: मागणी मान्य केल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे.
अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना प्रगत करणे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शाळांमध्ये पायाभूत चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागाकडून होत आहे. मात्र, या चाचण्यांबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्या संदर्भात शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, आमदार नागो गाणार यांनी शुक्रवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली, तसेच अनेक शाळांमध्ये पायाभूत परीक्षांसोबतच शालेय स्तरावरच्या परीक्षांचे आयोजनही केल्यामुळे, विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव मांडले. शिक्षकांना दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा ताण सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.
प्रत्यक्ष अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाचन क्षमता कमी असणाºया विद्यार्थ्यांसाठी मूलभूत वाचन क्षमता सारखे प्रशिक्षण शिक्षण विभागाने सुरू केले आहे. यापुढेही या चाचण्यांच्या संकलित झालेल्या माहितीमुळे शिक्षण विभागाला अनेक उपक्रम, प्रशिक्षण हाती घेता येतील. त्यामुळे पायाभूत, नैदानिक चाचण्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.