पायाभूत सुविधा देणार
By admin | Published: October 10, 2015 01:38 AM2015-10-10T01:38:17+5:302015-10-10T01:38:17+5:30
राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर आहे. प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षक अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सामग्री
धुळे : राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर आहे. प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षक अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सामग्री उपलब्ध केली जात आहे. त्याद्वारे अत्याधुनिक यंत्रणेची ओळख करून दिली जाईल, अशी माहिती राज्याचे प्रशिक्षण व खास पथकांचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी येथे दिली.
पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक ४ च्या दीक्षांत समारंभात त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रांची सद्य:स्थिती, धोरणात्मक निर्णय व भविष्यातील नियोजन याची माहिती दिली.
‘पोलीस दलाचा सर्व कारभार आॅनलाइन झाला आहे. सीसीटीएनएस प्रणाली त्याचाच एक भाग आहे. संगणक साक्षरता हा प्रशिक्षणाचा एक भाग असेल,’ असे ते म्हणाले.
काही प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणार्थींना त्रास दिला जातो. त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, अशा तक्रारी ऐकून आहे. कारवाईच्या भीतिपोटी कुणीही स्वत:हून तक्रार करायला पुढे येत नाही. त्यावर उपाय म्हणून वरिष्ठांकडे थेट आॅनलाइन तक्रार करता येऊ शकते. राज्यातील चार विभागांची सध्या या संदर्भात चौकशी सुरू आहे.
अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार केंद्राच्या प्राचार्यांना दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रशिक्षणार्थींचा गौरव
सुमित सुधाकर इंधाटे, तुषार दिलीपराव इंगळे, प्रदीप नामदेव पवार, अतुल अनिल मोरे, आप्पासाहेब मल्हारी घोडके, सैफनमुलक मोहंमद रफिक नदाफ, गजानन पांडुरंग देसाई, अमोल पंडित भगत यांचा गौरव करण्यात आला.
अधिकाऱ्यांमध्ये उपअधीक्षक विलास वामनराव कोहीनकर, पोलीस निरीक्षक मनोहर पगार, राखीव सहायक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक रामरतन जाधव, तसेच पोलीस उपअधीक्षक राम सोमवंशी यांना गौरवण्यात आले.