अमानुष हत्याकांड

By admin | Published: February 29, 2016 04:52 AM2016-02-29T04:52:45+5:302016-02-29T04:52:45+5:30

साखरझोपेत असलेल्या आपल्याच कुटुंबातील एकूण १४ जणांची हसनैन वरेकर या माथेफिरू तरुणाने ‘कुर्बानी’ देण्याच्या चॉपरने रविवारी पहाटे हत्या केली.

Inhuman Massacre | अमानुष हत्याकांड

अमानुष हत्याकांड

Next

ठाणे : साखरझोपेत असलेल्या आई, वडील, पत्नी, तीन बहिणींसह दोन मुली आणि बहिणींची मुले अशा आपल्याच कुटुंबातील एकूण १४ जणांची हसनैन वरेकर या माथेफिरू तरुणाने ‘कुर्बानी’ देण्याच्या चॉपरने रविवारी पहाटे हत्या केली. त्यानंतर, स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या वडवली गावात अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या क्रूर हत्याकांडाने ठाणे शहर हादरून गेले.
हसनैन अन्वर वरेकर (३५) या माथेफिरूने हे हत्याकांड नेमके कोणत्या कारणासाठी केले, याचा तपास सुरू असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. मानसिक स्थिती बिघडल्याने किंवा कौटुंबिक कलहातून ही घटना घडली का? याचा पोलीस तपास करीत आहेत. हसनैनचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
हत्याकांडातून त्याची बहीण सुबिया (२२, रा. म्हापोली, भिवंडी) सुदैवाने बचावली. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले आणि आपला जीव वाचविला. तिचा आक्रोश ऐकून हसनैनचे मामा आणि चुलत्यांनी खिडकीचे ग्रील तोडून सुबियाची सुटका केली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या जबानीनंतरच या सर्व प्रकाराचा उलगडा होईल. घरातील चादरी, गाद्या आणि उशा रक्ताने अक्षरश: माखल्याने पोलिसांना मृतदेह गुंडाळण्यासाठी चादरींची शोधाशोध करावी लागली. घरातील सर्व मृतदेह बाहेर काढल्यानंतर सर्वांत शेवटी हसनैनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सीबीआयकडून चौकशी व्हावी
वरेकर हत्याकांडाची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग किंवा केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी त्याची पत्नी जबीनचे चुलते व तळवली अर्जुलीचे माजी सरपंच सलीम नजे आणि इरफान पटेल यांनी केली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्याकांडानंतर ‘बघ्यां’ची गर्दी उसळल्याने दंगल नियंत्रण पथकाला बोलवावे लागले.
सुबिया वाचली...
सुबिया जागी होताच हसनैनने तिच्यावरही चॉपरचा वार केला. तिने तो कसाबसा चुकवला, तरीही तिच्या मानेला गंभीर जखम झाली आणि तिने पळ काढला. बेडरूमला तिने लागलीच कडी लावली आणि खिडकीच्या ग्रीलवर बसून बचावासाठी धावा करू लागल्याने, ती यातून बचावली.
अन्नाचे नमुने घेतले : या कुटुंबीयांनी रात्री तंदुरी चिकन आणि सरबत घेतले होते. त्यासह रक्त, व्हिसेरा आदींचे नमुने घेण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याबाबत बोलता येईल, असेही सहपोलीस आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.
चार वर्षांपूर्वीही विषप्रयोग ?
एनर्जी ड्रिंक म्हणून कोणत्यातरी ‘भोंदू’ वैदूने दिलेल्या औषधामुळे ही विषबाधा झाली होती. यासंदर्भात
१ जुलै २०१२ रोजी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून, तसा जबाब हसनैनच्या वडिलांनी दिला आहे.
सहपोलीस आयुक्त आशुतोष
डुंबरे यांच्याकडे याबाबत
विचारणा केली असता ते म्हणाले, चर्चांवर भाष्य करता येणार नाही. पण, त्यांनी घेतलेल्या औषधासह ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले, तेथील रेकॉर्ड गोळा करण्यात येणार आहे; तसेच या कुटुंबीयांविरोधात कोणती तक्रार आहे, याचाही शोध घेण्यात येत आहे.
अशी आहेत मृतांची नावे : अन्वर इस्माईल वरेकर (५८,
हसनैनचे वडील), अजगरी अन्वर वरेकर (५०, हसनैनची आई), पत्नी जबीन (२८), मुलगी मुब्बतशिरा (४), उमेरा (३ महिने), बहीण शबीना शौकत खान (३५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), बत्तुल अन्वर वरेकर (२८, अविवाहित बहीण), मारिया हरफन फकी (२८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), अनस शौकत खान (१२, भाची, कोपरखैरणे), अलीहसन शौकत खान (५, भाचा, रा. कोपरखैरणे), युसूफ अरफान फकीर (४, भाचा, रा. कोपरखैरणे), अरसिया जोसेफ भरमल (५ महिने, जखमी बहिणीची मुलगी), उमेर अरफान फकी (५), सादीया शौकत खान (१६, भाची, रा. कोपरखैरणे)

Web Title: Inhuman Massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.