अमानुष लाठीमार कुणावर शेकणार?
By admin | Published: December 21, 2015 02:15 AM2015-12-21T02:15:12+5:302015-12-21T02:15:12+5:30
थेट मुख्यमंत्र्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे आंदोलकांवर झालेला लाठीमार कुणावर शेकणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. गृहविभाग, तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या असून
नरेश डोंगरे, नागपूर
थेट मुख्यमंत्र्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे आंदोलकांवर झालेला लाठीमार कुणावर शेकणार, यावर सध्या चर्चा सुरू आहे. गृहविभाग, तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या असून, मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांना जाब विचारल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे.
तीन दिवसांत अमानुष लाठीहल्ल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे विरोधकांसह सत्तापक्षातील नेत्यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी मातंग समाजाच्या मोर्चेकऱ्यांवर आणि बुधवारी संगणक कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. हिंसा करणाऱ्यांनाच पायावर लाठी मारावी, असा दंडक आहे. पोलिसांनी मात्र आंदोलकांना अक्षरश: चोपले. मुख्यमंत्र्यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला असून, पोलीस आयुक्त शारदा यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी शनिवारी फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
लाठीहल्ल्याची आणि त्यानंतरची स्थिती सीसीटीव्हीतून तपासली जात आहे. कुणाचा दोष आहे, ते स्पष्ट होईल. पोलीस दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. - एस.पी. यादव, पोलीस आयुक्त, नागपूर