भोंग्यांबाबत मुस्लीम कौन्सिलचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:52 AM2022-04-18T06:52:52+5:302022-04-18T06:54:11+5:30
मुंबई : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली, तर भाजपच्या काही नेत्यांकडून हनुमान ...
मुंबई : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली, तर भाजपच्या काही नेत्यांकडून हनुमान चालिसा म्हणण्यासाठी भोंगे वाटले जात असल्याने समाजात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. ते रोखण्यासाठी महाराष्ट्र मुस्लिम कौन्सिलने पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्यांवर बंदी घातली नसली तरी त्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत मशिदीचे ट्रस्टी व धार्मिक नेत्यांच्या भेटी घेऊन त्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत.
राज्यात धार्मिक सोहार्दाचे वातावरण कायम राहावे आणि भोंगे हा राजकीय विषय बनू नये, यासाठी बोरीबंदर येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ग्रंथालयात त्याबाबत नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये सध्या ज्या मशिदीवर लाऊडस्पीकर लावलेले आहेत, त्यासाठी पोलिसांची परवानगी आहे; मात्र त्याचा आवाज ठरावीक डेसिबल्समध्ये ठेवावा, त्याचा इतर कोणालाही त्रास होऊ नये यासाठी कौन्सिल प्रयत्नशील आहे.
राज्यात बंधुभावाचे वातावरण, कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वांची जबाबदारी आहे. राजकीय फायद्यासाठी केवळ एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये. कायदा प्रत्येक समाजासाठी समान असला पाहिजे.
- एम. ए. खालिद,
सरचिटणीस, अखिल भारतीय मिली कौन्सिल ऑफ महाराष्ट्र