मुंबईतील कुपोषित बालकांसाठी ‘डॉक्टर्स फॉर यू’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:19 AM2017-10-23T02:19:17+5:302017-10-23T02:19:47+5:30
मुंबई शहर-उपनगरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषत: या परिसरातील बालकांचे आरोग्य ही अत्यंत नाजूक समस्या आहे.
मुंबई : मुंबई शहर-उपनगरातील झोपडपट्ट्यांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. विशेषत: या परिसरातील बालकांचे आरोग्य ही अत्यंत नाजूक समस्या आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाय स्थानिकांच्या आरोग्याचा विचार करून मुंबईतील ‘डॉक्टर्स फॉर यू’ या सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यायचे ठरविले आहे.
डॉक्टर्स फॉर यू संस्था या भागातील प्रत्येक घराघरात जाऊन लोकांना खाण्याच्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी देते. जेणेकरून कुपोषणाची समस्या कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ३०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील सहा वर्षांपर्यंतची ११७ मुले कुपोषित आहेत. या वर्षी एप्रिल ते आॅगस्ट या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले. डॉक्टर्स फॉर यू या संघटनेचे प्रमुख, डॉ. अमित नोहवार यांनी याविषयी सांगितले की, आमचा दवाखाना हा प्रामुख्याने मुलांसाठी आहे. कुपोषणाचा प्रश्न काही नवीन नाही. तसेच, आम्ही त्या बालकांच्या घरच्यांसोबत काम करतो आणि लोकांना मदत करण्यासाठी हा दवाखाना आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.