मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा
By admin | Published: July 15, 2017 01:46 AM2017-07-15T01:46:44+5:302017-07-15T01:46:44+5:30
तरुण व पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सक्रिय सहभागी व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : तरुण व पात्र मतदारांच्या नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांनी सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांचे नाव मतदारयादीमध्ये नोंदविण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत १८ ते २१ वर्षांच्या तरुण व पात्र प्रथम मतदारांचा समावेश मतदारयादीमध्ये करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आणि नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात, मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम प्राधान्याने राबवावी, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी या वेळी अधिकाऱ्यांना केली. बैठकीला जिल्ह्यातील मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित
होते.
मतदार नोंदणीसाठी प्रशासनाकडून विविध स्तरात जनजागृती केली जात आहे. अधिकाधिक नागरिकांनी नवमतदार नोंदणी करावी, यासाठी महाविद्यालयातही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
>नाव नोंदणी : ३१ जुलैपर्यंत विशेष मोहीम
तरुण व पात्र प्रथम मतदारांच्या मतदारयादीमध्ये नावनोंदणीसाठी ३१ जुलै पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या १८ ते २१ वयोगटातील सर्व पात्र व तरुण मतदारांचे अर्ज भरून घेण्यात यावे, महाविद्यालयांना फॉर्म क्रमांक ६ चे वाटप करावे, मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.
मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश दिला. तसेच मतदारयादीत नाव समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नावनोंदणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.