इंजेक्शन योग्यच
By admin | Published: September 13, 2014 04:44 AM2014-09-13T04:44:03+5:302014-09-13T04:44:03+5:30
कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये १८ आॅगस्टला रात्री महिला वॉर्डातील ३२ महिलांना तापाच्या इंजेक्शनची अॅलर्जी झाली होती
मुंबई : कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये १८ आॅगस्टला रात्री महिला वॉर्डातील ३२ महिलांना तापाच्या इंजेक्शनची अॅलर्जी झाली होती. इंजेक्शन सदोष असू शकतील, असा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला होता, मात्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीअंती प्रतिजैविकांमध्ये कोणताही दोष नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाभा रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये ताप आलेल्या रुग्णांना १८ आॅगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास सेफोटॅक्झिम आणि सेफ्ट्रीअॅक्झोन प्रतिजैविके देण्यात आली होती. तासाभरानंतर ३२ महिलांना थंडी, उलट्यांचा त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना सायन आणि केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यातील सायरा शेख (४७) या महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर तत्काळ या बॅचमधील प्रतिजैविकांचा वापर बंद करण्यात आला होता.
या बॅचमधील प्रतिजैविके आधीही वापरली जात होती. मात्र त्या वेळी कोणत्याही प्रकारची अॅलर्जी कोणत्याही रुग्णाला झाली नव्हती. मात्र याच दिवशी असे का झाले, हे शोधण्यासाठी या प्रतिजैविकांचे नमुने प्रशासनाने घेतले होते. तीन तपासण्या झाल्यावर या प्रतिजैविकांमध्ये कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल गुरुवारी प्रशासनाने महापालिकेकडे दिलेला आहे, अशी माहिती प्रशासनाचे सहआयुक्त (औषध) एस.टी. पाटील यांनी दिली.
प्रतिजैविकांमध्ये कोणताही दोष नाही तर अॅलर्जी कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कुर्ला भाभा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांच्याकडे अहवाल सादर करणार होते. पण हा अहवाल त्यांनी सादर केला की नाही, या अहवालामध्ये काय निदान झाले आहे, याची माहिती अजूनही मिळालेली नाही. (प्रतिनिधी)